Maharashtra vidhan sabha Election 2024: मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पहिली बंडखोरी? बबनराव पाचपुते तातडीने सपत्नीक फडणवीसांच्या बंगल्यावर
Maharashtra vidhan sabha Election 2024: भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुते हे बंडाचे निशाण फडकावण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
मुंबई: भाजपने 99 विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. बंडखोरीचे पहिले निशाण श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून फडकावले जाण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून (Shrigonda Vidhan Sabha) भाजपने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदारसंघातून भाजपच्या जुन्या पदाधिकारी सुवर्णा पाचपुते (Suvarna Pachpute) यादेखील इच्छूक होत्या. त्यामुळे प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सुवर्णा पाचपुते यांच्याकडून बंडाचा इशारा देण्यात आला आहे. भाजपने पुन्हा पाचपुते कुटुंबीयांनाच तिकीट दिल्याने त्या प्रचंड नाराज असल्याचे समजते.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बबनराव पाचपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईतील सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते हे दोघेही त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र, भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली.
उमेदवारी न मिळाल्याने सुवर्णा पाचपुतेंच्या डोळ्यात अश्रू
भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक विधानसभा मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे, असं म्हणत पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली. सोबतच सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. मात्र, भाजपचे चिन्ह कार्यालयातून हटवताना त्यांना भरून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजप त्यांची मनधरणी करणार का, हे पाहावे लागेल.
पुण्यातही भाजपसमोर बंडखोरीचं आव्हान
पुण्यात अमोल बालवडकर आणि श्रीनाथ भिमाले यांचे बंडखोरीचे संकेत. अमोल बालवडकर हे कोथरूड मधून इच्छुक आहेत आणि तसा त्यांनी कार्यक्रमाचा सपाटा देखील लावला होता. त्यासोबतच श्रीनाथ भिमाले हे पर्वती मतदारसंघातून इच्छूक होते. त्यांनीदेखील आमची भूमिका स्पष्ट करु, असं सांगितलं आहे. त्यामुळे आता हे बंडखोर भाजपला जड ठरणार का ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
भाजपच्या 99 जणांच्या पहिल्या यादीत 80 विद्यमान आमदारांना संधी, 13 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, नेत्यांची मुलं आणि पत्नींचाही समावेश.. भाजपच्या 21 विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे.तिकिटांची अजून घोषणा झालेली नाही. सर्वाधिक 10 उमेदवार विदर्भातील आहेत.भाजपाने आज जाहीर केलेल्या 99 मतदारसंघांपैकी 85 ठिकाणी 2019 मध्ये भाजपने विजय मिळवला होता. त्या 85 आमदारांपैकी 80 आमदारांना आज पुन्हा संधी देण्यात आली आहे. जाहीर झालेल्या 99 विधानसभा मतदारसंघांपैकी 60 मतदारसंघांमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप किंवा एनडीए आघाडीवर होते.
आणखी वाचा