सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य उपमुख्यमंत्री, 2024 साठी पवार-ठाकरेंचा मोठा प्लॅन होता - बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केलाय.
Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केलाय. सुप्रिया सुळे (supriya sule) यांना मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा प्लॅन होता, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केला आहे. भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क आणि चर्चेला उधाण आलं आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी एक प्लॅन आखला होता. 2024 मध्ये महाराष्ट्रात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करण्याचं, त्यांचं षडयंत्र होतं, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पण एकनाथ शिंदेंनी बंड करत हे षडयंत्र हाणून पाडलं, असंही ते पुढे म्हणाले.
2024 पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर मात्र सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद, तर आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित केला होता. त्यांचं षडयंत्र होतं. त्यासाठी जाणीवपूर्वक शिवसेनेचे कमी आमदार निवडून आणायचे, असेही ठरले होते. ही गोष्ट समोर आल्यामुळे शिवसेनेतील आमदारांनी उठाव केला आणि एकनाथ शिंदे यांनी षडयंत्र हाणून पाडले, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
पाहा बावनकुळे नेमकं काय म्हणाले ?
शिवसेना आमदारांसाठी जास्त काम करू - बावनकुळे
भाजप आणि शिवसेना एक परिवार आहे. परिवारातील दोन भावांमध्ये मतभेद होत असतात, ते दूर करण्यासाठी पक्षनेतृत्व सक्षम आहे. एखाद्या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेना युती तुटणार नाही. ही युती 'फेव्हिकॉल'ने जोडलेली आहे. राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार येईल. शिवसेनेचे आमदार निवडून येण्यासाठी भाजपच्या उमेदवारांपेक्षाही दहा टक्के अधिकचे काम आम्ही करू, असेही बावनकुळे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जनतेच्या मनात सध्या गोंधळ आहे. वेगवेगळ्या बातम्यांमधून त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. शिंदे गटातील आमदारांनी 50 खोके घेतल्याचे आरोप केले जातात. पण हे आरोप खोटे आहेत. तसा नरेटिव्ह तयार करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असा करार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये झाला असेल. या कराराच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी आपले सर्व आमदार गमावण्याचा निर्णय घेतला. याची शिंदे गटातील आमदारांना भीती वाटली, म्हणून त्यांनी सत्ता सोडली. त्यांनी खोके वगैरे घेतले नाहीत, असंही बावनकुळे म्हणाले.