एक्स्प्लोर
Advertisement
औसा विधानसभा मतदारसंघ : बाहेरचा आणि भूमिपुत्र या वादाची सुरुवात तर झालीय
औसा. लातूर शहरापासून जेमतेम वीसेक किलोमीटर अंतरावरील तालुका आणि मतदारसंघ. अगदीच नगण्य अंतर असल्यामुळेच की काय औसा विकासाच्या बाबतीत कायम दुर्लक्षित राहिला आहे. सध्या काँग्रेसचे बसवराव पाटील तिथले आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अभिमन्यू पवार औस्यातून उत्सुक असल्याने ही निवडणूक लक्षवेधी होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी दंड थोपटल्याने अलीकडील काही दिवसांपासून औसा विधानसभा मतदार संघ राजकीयदृष्ट्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एकापेक्षा एक प्रगल्भ, दूरदृष्टीच्या नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेला औसा हा लातूर जिल्ह्यातील राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, कृषि विशेष वैशिष्ट्यपूर्ण राहिलेला आहे. तरीही कायम दुर्लक्षित मतदार संघ असाही औस्याचा लौकिक आहे. इथली द्राक्षे आणि माणसं सारखीच. पण द्राक्ष उत्पादन घटलं अन माणसं बेरकी झाली, इतकाच काय तो बदल मतदार संघात गेल्या पाच-साडेपाच दशकात झाला असेल.
वारकरी संप्रदायाची पताका अविरत फडकवत ठेवणाऱ्या नाथपीठाचा वारसा लाभलेला औसा हा भौगोलिकदृष्ट्या लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका. राजकीयदृष्ट्या काँग्रेस विचारसरणीने भारलेला परिसर. विकासाची दृष्टी लाभलेले नेते तालुक्याला लाभले. पण विकासाची कामे व्हायला हवी त्या प्रमाणात झाली नाहीत. मात्र, भूमिपुत्रांकडून राहिलेली कसर बाहेरून आलेल्या बसवराज पाटील यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. आज 'भूमिपुत्र' हा औसा मतदार संघात कळीचा मुद्दा बनला आहे. कारण उस्मानाबाद जिल्हयातील मुरूमचे मूळ रहिवासी बसवराज पाटील हे गेली दहा वर्षे औस्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अभिमन्यू पवारांनी आव्हान दिले आहे. पवारांचे राजकीय विरोधक आणि जिल्हयाचे पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या गटाकडून भूमीपुत्राचा मुद्दा उचलण्यात आला आहे. त्यामुळे तसं वातावरण निर्माण केलं जात आहे.
औस्याची जागा युतीत शिवसेनेकडे आणि आघाडीत काँग्रेसकडे असते. गेल्या वेळी युती मोडली तशी आघाडीही तुटली. प्रमुख चारही पक्षांना आपली कुवत कळून आली. शिवसेनेने १९९९ आणि २००४ असे दोनवेळा दिनकर माने यांच्या माध्यमातून आपली पकड बसवली. माने यांच्या विजयात तत्कालीन परिस्थितीतली राजकीय समीकरणे आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मोठा सहभाग राहिला. माने हे विलासरावांचे कट्टर समर्थक. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून देत सर्व प्रकारचे बळ पुरवत देशमुख गटाने शिवराज पाटील चाकूरकर गटाच्या मुजीबुद्दीन पटेल यांचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका बजावली. लातूर जिल्हयातील काँग्रेस अंतर्गत राजकारण, चाकूरकर-देशमुख गटातील सुप्त संघर्ष, जातीच्या राजकारणात देशमुख गट औसा तालुक्यात वरचढ ठरला.
मात्र, गेल्या दहा वर्षात परिस्थिती बदलली. चाकूरकर गटाच्या बसवराज पाटील यांनी सर्व डावपेच धुळीस मिळवत दोन वेळा विजय संपादन केला. मराठा बहुसंख्यक मतदार संघात लिंगायत आणि मुस्लिम समाजाची ताकद मोठी आहे. त्यामुळे अभिमन्यू पवार विरुद्ध बसवराज पाटील असा सामना झाल्यास तो जातीच्या मुद्यावरच होईल. शिवसेनेचे दिनकर माने, संतोष सोमवंशी, भाजपचे किरण उटगे, बजरंग जाधव, या प्रमुख इच्छुकांसह अन्य अर्धा डझन इच्छुक रांगेत आहेत. या मतदार संघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम भक्कम आणि मुळापर्यंत पोहचलेले आहे. मात्र, आजवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच सर्व प्रमुख लढती झालेल्या आहेत. आजवर झालेल्या एकूण १२ पैकी दोन निवडणुकांत भाजपने आपले बळ तपासून पाहिले आहे. २०१४ मध्ये ऐनवेळी उमेदवारी मिळालेल्या पाशा पटेल यांनी घेतलेली मते भाजपसाठी आश्चर्यकारक ठरली.
पाशा पटेल यांच्या मतांमध्ये आणखी थोडी वाढ करण्याची किमया अभिमन्यू पवार यांना साधता आली तर औस्याचे राजकीय चित्र वेगळं दिसू शकेल. काँग्रेस अंतर्गत चाकूरकर-देशमुख गटातील संघर्षाचा मागचा कित्ता पुढे चालू राहणार आहे, यात कसली शंका नाही. त्याला भाजपांतर्गत पालकमंत्री निलंगेकर गटाच्या विरोधातला गट प्रबळ साथ देत आहेच. गेल्या पाच वर्षात संभाजीराव पाटील यांचे राजकीय महत्व खूपच वाढलं आहे. त्यांना आवरण्यासाठी भाजपांतर्गत गटांना अभिमन्यू पवार यांचा उपयोग होणार आहे. अभिमन्यू यांच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात असल्याने निलंगेकर गट योग्य वेळेची प्रतीक्षा करीत आहे. ती औसा विधानसभेच्या निमित्ताने मिळणार आहे. म्हणूनच भूमिपुत्र मुद्द्याला जोरदार हवा दिली जात आहे.
औसा विधानसभा मतदारसंघातील ६८ गावे ही निलंगा तालुक्यातील आहेत. या गावावर पालकमंत्री निलंगेकरांचे वर्चस्व आहे. भाजपातील गटबाजीत ही गावे कोणाच्या पारड्यात मतदान करतात, यावरच अनेक गणितं अवलंबून आहेत. पालकमंत्री निलंगेकर जिल्ह्यात दुसरे सत्ताकेंद्र तयार होऊ नये याची काळजी घेत आहेत. त्याचवेळी मागील तीन वर्षांपासून अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या मदतीने अनेक विकासकामांचा वेग वाढवला आहे. जनसंपर्क वाढवत, कार्यकर्त्याची मोट बांधली आहे. भाजपातील हा संघर्ष आता काय दिशा घेणार यावर औसा विधानसभेचे नव्हे तर जिल्ह्याचे राजकीय चित्र ठरणार आहे.
या मतदारसंघात लिंगायत, मुस्लिम आणि मराठा समाजाची मते निर्णायक आहेत. लातूर शहरापासून अवघ्या वीस किलोमीटरवरील औसा शहराचा विकासच झाला नाही. आज ही गावागावात रस्ते वीज आणि पाणी या मूलभूत प्रशासाठीच संघर्ष सुरु आहे. कोणताही मोठा उद्योग नाही. शैक्षणिक सोयीही पुरेशा नाहीत. या मतदारसंघातील दोन सहकारी आणि एक खासगी साखर कारखाना पार बुडून गेल्यात जमा आहे. त्यात किल्लारीचा शेतकरी सहकारी साखर कारखाना, बेलकुंडचा मारोती महाराज साखर कारखाना आणि खासगी साईबाबा साखर कारखाना बुडीत निघाले आहेत. पावसाची कायमच अवकृपा असलेला हा भाग आहे. साखर कारखाना, पाणी आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाभोवती निवडणूक फिरणार शिवाय त्याला जातीय राजकारणाची फोडणी आहेच. या मतदारसंघात काय होईल, ते पुढील पंधरवड्यात स्पष्ट होईलच.
बसवराज पाटील (काँग्रेस) ६४ हजार २३७
दिनकर माने (शिवसेना) ५५ हजार ३१९
पाशा पटेल (भाजपा) ३७ हजार ४१४
इतर सर्व पक्ष आणि अपक्ष १७ हजार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement