Assembly election results 2021 counting : मतमोजणीला लागणार अपेक्षेपेक्षा जास्त वेळ ; जाणून घ्या काय आहे त्यामागचं कारण
कोरोना काळात ओढावलेलं संकट पाहता काही महत्त्वाच्या निर्बंधांचं पालन करत मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
Assembly election results 2021 counting : देशातील पाच राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट असतानाही तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी येथे निवडणुका पार पडल्या. ज्यानंतर आता अनेक प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार यंदाच्या निवडणुकांचे निकाल हाती येण्यासाठी अपेक्षेहून जास्त वेळ जाऊ शकतो. यामागचं कारण ठरत आहे, निर्बंधांचं पालन करत केली जाणारी मतमोजणी. याशिवायही निकाल हाती येण्यास दिरंगाई होण्यासाठी इतर काही मुद्दे कारणीभूत ठरणार आहेत.
एबीपी न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार वरिष्ठ पत्रकार दिबांग यांच्या माहितीनुसार मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर दोन ते तीन तासांमध्ये लक्षात येत होतं की कोणत्या पक्षाकडे सत्तास्थापनेची ताकद आहे. पण, यावेळी मात्र यासाठी काहीसा जास्तीचा वेळ दवडला जाऊ शकतो.
Election Results 2021 LIVE: प. बंगालपासून केरळपर्यंत, मतमोजणीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
निवडणुकीचे निकाल हाती येण्यास दिरंगाई का होणार
- कोरोनाचा संसर्ग पाहता पोस्टल बॅलेटची संख्या वाढवण्यात आली आहे. ज्यांच्या मोजणीसाठी जास्त वेळ जाणार. यावेळी पोस्टल मतदानासाठी दिव्यांग आणि वयोवृद्धांनाही ही सवलत देण्यात आली होती.
- कोरोनाचं संकट पाहता यंदा मतदान केंद्रांचीही संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळं इव्हीएम मशिन्सचीही संख्या वाढली होती. मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा जवळपास 30 टक्के जास्तीच्या ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता.
- यापूर्वी सर्वसाधारणपणे 14-15 फेऱ्यांमध्ये निवडणुकांचे निकाल हाती आले होते. पण, यावेळी 18-20 फेऱ्यांमध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे.
- सध्याच्या मतमोजणीमध्ये टेबलांची संख्याही 15 वरुन 7 वर आणण्यात आली असून, या माध्यमातून सोशल डिसटन्सिंगची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.