(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar: गोविंद बागेत न जाता काटेवाडीत का साजरा केला पाडवा? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'साहेबांना भेटण्यासाठी...'
Ajit Pawar on Padava Festival : बारामतीतील दोन्ही पाडव्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. अजित पवार यांनी पाडव्याला गोविंद बागेत का गेले नाहीत? याबाबतचं कारण सांगितलं आहे.
Ajit Pawar on Padava Festival : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर बारामतीमध्ये पहिल्यांदाच दोन ठिकाणी दिवाळी पाडवा उत्सव साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बागेत तर अजित पवार यांचा दिवाळी पाडवा काटेवाडीमध्ये पार पडला. अनेक वर्षांपासूनची परंपरा दिवाळी पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येतं. बारामतीतील दोन्ही पाडव्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. अजित पवार यांनी पाडव्याला गोविंद बागेत का गेले नाहीत? याबाबतचं कारण सांगितलं आहे.
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "काटेवाडीमध्ये दिवाळी पाडवा साजरा केला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नागरिक भेटण्यासाठी आले होते. आलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज कार्यकर्त्यांसोबत अनेक लाडक्या बहिणी देखील काटेवाडीत भेटण्यासाठी आल्या. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी भेट घेतली. शेतकरी आले होते, दोन ठिकाणी पाडवा साजरा करण्याचं दुसरं काही कारण नाही एका ठिकाणी गर्दी झाली असती, लोक जास्त असले की वेळ जातो त्यामुळे इकडे लोक आले काही तिकडे गेले. माझे जे जुने पत्रकार मित्र आहेत त्यांना आठवत असेल पूर्वी काटेवाडीमध्येच पाडवा साजरा होत होता. पाडव्याच्या दिवशी काटेवाडीमध्ये कार्यकर्ते साहेबांना भेटण्यासाठी येत होते.
त्यानंतर पुन्हा गोविंद बागेची जागा घेतली. बारामतीमधील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते सोपं आणि सोईचं आहे. म्हणून त्यानंतर पाडवा हा गोविंद बागेतच साजरा व्हायला लागला. आजही भेटणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी खूप होती. लोकांनाही घरी जायची घाई असते, सण साजरा करायचा असतो. त्यामुळे होणारी गर्दी विभागली जावी, कार्यकर्त्यांना लवकर घरी जाता यावं म्हणून मी गोविंद बागेत गेलो नाही. काटेवाडीतच पाडवा साजरा केला. ज्या कार्यकर्त्यांना साहेबांना भेटायचं होतं तिकडे जाऊन त्यांना भेटले. ज्यांना मला भेटायचं होतं ते काटेवाडीत मला भेटले. त्यामुळे गर्दी विभागली गेली असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
दोन ठिकाणी पाडवा व्हायला नको अशी लोकांची भावना आहे. चांगली गोष्ट आहे. मला आनंद आहे. कार्यकर्त्यांची भावना आहे. अनेक वर्षाची परंपरा आहे. पाडवा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. या प्रांगणामध्ये आम्ही सर्वजण जमतो आणि ही जुनी पद्धत आहे. ही कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. पण ठिक आहे. लोकांना डबल ठिकाणी जावं लागलं. त्यांना त्याचा त्रास झाला. त्यामुळे मी अस्वस्थ आहे, असंही शरद पवार म्हणालेत.
आमच्या कुटुंबातील सर्व लोक पाडव्याच्या आदल्या दिवशी येतात. काल सर्व होते. अजितदादा काही कामामुळे आले नसतील. त्यांना वेळ मिळाला नसेल. पण सर्व होते. त्यांच्या दोन बहिणी इथेच होत्या. बंधु तर इथंच होते, बाकी सगळे जण होते. काही काही वेळा कामामुळे माझ्याकडूनही उशीर व्हायचा. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक आले. नागपूर, बुलढाणा, गडचिरोली, कोकणातील मुंबई, मराठवाड्यातील अनेक लोक भेटले. राज्याच्या अनेक तालुका आणि जिल्ह्यातील लोक आले. यावेळी नेहमी पेक्षा अधिक लोक आले, असं शरद पवारांनी म्हटलं. बारामतीमध्ये दरवर्षी पवार कुटुंबिय सकाळी एकत्र जमतात. दिवाळीच्या पाडवा उत्साह गोविंद बागेत साजरी होत होती. परंतु यंदा प्रथमच शरद पवार यांची दिवाळी गोविंद बागेत पाडवा साजरा झाला तर अजित पवार यांची दिवाळी काटेवाडीत साजरी झाली. त्यावर शरद पवार बोलत होते.