(Source: Matrize)
Arunachal Pradesh Results 2024: अजितदादांच्या राष्ट्रवादीने सीमेपार झेंडे रोवले, निवडणुकीत तीन उमेदवार विजयी, दोन उमेदवार अवघ्या 2 अन् 200 मतांनी पडले
Maharashtra Politics: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश, तीन जागांवर उमेदवार विजयी. अजित पवार गटासाठी ही खूप मोठी गोष्ट मानली जात आहे.
मुंबई: लोकसभा निवडणूक संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. या निवडणुकीत अजितदादा गटाचे (Ajit Pawar Camp) चार उमेदवार रिंगणात होते. तर राष्ट्रवादीच्या वाट्याची परभणीची पाचवी जागा अजित पवारांनी महादेव जानकर यांच्यासाठी सोडली होती. मात्र, अजित पवार यांनी लढवलेल्या एकाही जागेवर उमेदवार निवडून येतो की, नाही याबाबत साशंकताच आहे. एक्झिट पोलनुसार, अजित पवार गटाची फारफार तर एक जागा निवडून येऊ शकते. ही जागा कोणती असेल, हे स्पष्ट नाही. ही सगळी परिस्थिती पाहता अजितदादा गटाची राज्यातील कामगिरी यथातथाच म्हणावी लागेल. मात्र, या सगळ्या निराशाजनक परिस्थितीत अरुणाचल प्रदेशातून (Arunachal Pradesh Election Result) अजितदादांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
विधानसभेची मुदत संपत असल्याने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारीच पार पडली. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. यामध्ये भाजपने तब्बल 41 जागा जिंकत घवघवीत यश मिळवले. अन्य पाच जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याने विजयी जागांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कमाल
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 15 उमेदवार उभे होते. यापैकी तीन जण निवडून आले आहेत. तर एक उमेदवार दोन मतांनी पडला आहे. दुसरा उमेदवार 200 मतांनी पडला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष. 46 आमदार जिंकत भाजपने विधानसभेतील आपली सत्ता राखली.
अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवली 10 टक्के मतं
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रुफल पटेल यांनी अरुणाचल प्रदेशातील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या असून पक्षाला एकूण 10 टक्के मतं पडली आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्याच्यादृष्टीने हा विजय राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रफुल पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभेचा निकाल
विधानसभेतील एकूण जागांची संख्या - 60
भाजप - 46
नॅशनल पीपल्स पार्टी - 5
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - 3
पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल - 2
काँग्रेस - 1
अपक्ष - 3
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12
आणखी वाचा