मोठी बातमी : निकालानंतर राज ठाकरे मैदानात उतरणार, EVM बाबत लवकरच भूमिका मांडणार!
Raj Thackeray on EVM: विधानसभा निकालानंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. सध्या सर्वत्र सुरू असलेल्या EVM वरील आक्षेपानंतर राज ठाकरे देखील लवकरच भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे.
मुंबई: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं. महाविकास आघाडीसह इतर पक्षांना विधानसभेला मोठा फटका बसला. तर राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेण्यात आले आहेत, त्याबाबत अनेक उमेदवारांनी तक्रारी निवडणूक आयोगाकडे दिल्या आहेत, तर मोठ्या जोमाने निवडणुकीला सामोरं गेलेल्या मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. मनसेने देखील आता ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मागच्या काही दिवसापासून जे व्हिडिओ समोर येत आहेत, ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
अमेरिका सारख्या देशात जर बॅलेटवर मतदान होत असेल तर मग....
दहा वर्ष जे आमदार भेटत नव्हते. ते आमदार एकेक लाखाच्या मताने निवडून आले आहेत. ईव्हीएम शिवाय हा निकाल अशक्य आहे. ईव्हीएमने घात केला आहे. ईव्हीएममुळे अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे. एवढा मोठा विजय मिळवून देखील भारतीय जनता पक्षात आनंद व्यक्त होत नाही. ईव्हीएम विरोधात विरोधी पक्ष किती एकत्र आला, तरी काही होणार नाही. देशात काहीतरी चुकीचं चाललंय हे आता कळलं पाहिजे, अमेरिका सारख्या देशात जर बॅलेटवर मतदान होत असेल तर मग इथे कशाला ईव्हीएम पाहिजे असा सवाल देखील यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसेची सुद्धा फसवणूक झाली
या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसेची सुद्धा फसवणूक झाली आहे. न्यायालय त्यांचं, निवडणूक आयोग त्यांची मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा. या पुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाही, असा प्रश्न आता मला पडला आहे. हा निकाल सेट होता. सगळेच यांचे निवडून आले असते, तर लोकांनी यांना चपलेने मारलं असतं. ईव्हीएमबाबत राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील. उमेदवारांना लोक शिव्या घालत होते. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची लाट होती ही दिसत नव्हती, या उलट भारतीय जनता पक्षाबद्दलचा राग दिसला, मग इतक्या जागा कशा निवडून आल्या असं म्हणत त्यांनी शंका उपस्थित केला आहे.
मनसे आणि राज ठाकरेंची फसवणूक महायुती एवढी कोणीच केली नाही
निवडणुकीत एक पिक्चर तयार केला त्यात लाडकी बहीण बसवली, बटेंगे तो कटेंगे हे बसवलं गेलं. निकालानंतर मनसेच्या झालेल्या बैठकीत राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. त्यांनी फक्त उमेदवारांची म्हणणं ऐकून घेतलं. लवकरच राज ठाकरे यावर बोलणार आहेत. राज ठाकरे जेव्हा बोलतील त्यावेळी राज्याला कळेल ह्या निवडणुकीमध्ये काय काय झालं. मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत आमची कोणतीही अपेक्षा नाही. मनसे आणि राज ठाकरे यांची फसवणूक महायुती एवढी कोणीच केली नाही. लोकसभेवेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र, त्याची परतफेड आता महायुतीने कशी केली आहे हे तुम्हीच बघताय असं म्हणत अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी हल्लाबोल केला आहे.