Lok Sabha Election LIVE BLOG | गडचिरोलीतील चार केंद्रांवरील मतदान पुढे ढकललं
LIVE
Background
मुंबई : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. यंदा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील.
नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यासारख्या दिग्गज नेत्यांसह 116 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहेत. चार जागांवर भाजप आणि काँग्रेसचा थेट सामना होणार आहे, तर दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना भिडणार आहेत.
14 हजार 919 मतदान केंद्रांवर जवळपास 1.30 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी 66.71 लाख पुरुष, 63.64 लाख महिला, तर 181 तृतीयपंथी मतदार आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमुरमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत मतदान होईल.
पहिल्या टप्प्यात 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यातील प्रमुख लढती (07)
नागपूर - नितीन गडकरी (भाजप) VS नाना पटोले (काँग्रेस)
वर्धा - रामदास तडस (भाजप) VS चारुलता टोकस (काँग्रेस) VS अॅड. धनंजय वंजारी (वंचित बहुजन आघाडी)
यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (शिवसेना) VS माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
गडचिरोली-चिमुर अशोक नेते (भाजप) VS नामदेव उसेंडी (काँग्रेस)
चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप) VS बाळू धानोरकर (काँग्रेस)
रामटेक - कृपाल तुमाणे (शिवसेना) VS किशोर गजभिये (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) VS नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड मानला जाणाऱ्या नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सामना भाजपवर शरसंधान साधून काँग्रेसमध्ये घरवापसी करणाऱ्या नाना पटोले यांच्याशी होणार आहे.
नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडेंनी पोटनिवडणुकीत जिंकलेली भंडारा-गोंदियाची जागा परत मिळवण्यासाठी भाजपने सुनील मेंढे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्याविरोधात पुन्हा कुकडेंना उमेदवारी न देता राष्ट्रवादीने नाना पंचबुद्धेंना तिकीट दिलं आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर चौथ्यांदा चंद्रपुरातून खासदारपदी विराजमान होण्यास उत्सुक आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू उर्फ सुरेश धानोरकरांचं आव्हान आहे.
वर्ध्यात विद्यमान खासदार रामदास तडस यांना काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस टक्कर देणार आहेत. गडचिरोली-चिमुरमध्ये विद्यमान खासदार अशोक नेतेंसमोर काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचं आव्हान आहे.
यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. तर बच्चू कडू यांच्या 'प्रहार'कडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटिका वैशाली येडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पहिला टप्पा - (91)
आंध्र प्रदेश - 24
अरुणाचल प्रदेश - 2
आसाम - 5
बिहार - 4
छत्तीसगढ - 1
जम्मू काश्मिर - 2
महाराष्ट्र - 7
मणिपूर-1
मेघालय - 2
मिझोराम - 2
नागालँड-1
ओदिशा - 4
सिक्कीम - 1
तेलंगणा- 17
त्रिपुरा- 1
उत्तर प्रदेश - 8
उत्तराखंड - 5
पश्चिम बंगाल - 2
अंदमान निकोबार - 1
लक्षद्वीप - 1
संबंधित बातम्या :
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात, राज्यात सात जागांसाठी मतदान
राज्यात 3 लाखांहून अधिक दिव्यांग मतदार, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा
माओवाद्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या इशाऱ्यानंतर गडचिरोली-चिमुर मतदार संघात अतिरिक्त पोलीस बल तैनात
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे, त्या सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?
'या' कारणामुळे मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली