(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चिकनमध्ये मीठ जरा कमी पडलंय...; पतीचं वाक्य ऐकताच पत्नी संतापली, लोखंडी रॉडनं वार करुन नवऱ्याला मारून टाकलं
Crime News : नवऱ्यानं जेवताना चिकनमध्ये मीठ कमी असल्याचं सांगितलं. नवऱ्यानं जेवणाबाबत केलेली तक्रार बायकोला आवडली नाही. काही वेळातच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. अन्...
Crime News : नवी दिल्ली : एका पतीला बायकोन बनवलेल्या जेवणाची तक्रार करणं खूपच महागात पडलं आहे. एवढं महागात पडलंय की, यामुळे पतीला आपला जीव गमवावा लागला आहे. जेवणासाठी बायकोनं चिकन बनवलं होतं. नवरा हात-पाय धुवून जेवणाच्या ताटावर बसला, पहिला घास तोंडात टाकताच चिकनमध्ये मीठ कमी असल्याचं नवऱ्याच्या लक्षात आलं. नवऱ्याची तक्रार ऐकून पत्नीला राग अनावर झाला. ती अस्वस्थ झाली. तिनं मागचा पुढचा कोणताही विचार न करता लोखंडी रॉड आणला आणि पतीला मारहाण सुरू केली. यामध्ये तिच्या बहिणीनं देखील तिला साथ दिली. दोघींनी मिळवून त्याला एवढी मारहाण केली की, त्यानं जीव सोडला. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही बहिणींना अटक केली आहे.
बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यात पत्नीनं आपल्याच पतीला बेदम मारहाण केली. नवऱ्याचा दोष एवढाच होता की, बायकोनं त्याला जे चिकन खायला दिलं होतं, त्यात मीठ कमी होतं. याबाबत पतीनं पत्नीकडे तक्रार केल्यावर ती अस्वस्थ झाली. त्यावेळी महिलेची बहीणही त्यांच्या घरी होती. संतापलेल्या महिलेनं तिच्या बहिणीसोबत पतीला एवढी मारहाण केली की, त्याचा मृत्यू झाला. हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन्ही बहिणींना अटक केली आहे. हे प्रकरण चौतरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हुआ गावातील आहे. 35 वर्षीय शमशेर आलम उर्फ लालू असं मृताचं नाव आहे. त्याची पत्नी शहनाज बेगम आणि अल्पवयीन वहिनीला पोलिसांनी अटक केली आहे. शमशेर आणि शहनाज यांना तीन मुलं आहेत. चिकनमध्ये मीठ जास्त असल्याचा आरोप आहे, ज्याची तक्रार समशेर आलमनं त्याच्या कुटुंबीयांकडे केली होती. त्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झालं आहे.
अल्पवयीन मेहुणीनं बहिणीची साथ देत मेहुण्याला यमसदनी धाडलं
नवऱ्यानं जेवताना चिकनमध्ये मीठ कमी असल्याचं सांगितलं. नवऱ्यानं जेवणाबाबत केलेली तक्रार बायकोला आवडली नाही. काही वेळातच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. रागाच्या भरात शहनाजनं लोखंडी रॉड आणि काठी आणली. त्यावेळी शहनाजची अल्पवयीन बहिणही घरात होती. दोघांनी मिळून समशेरला काठ्या आणि लोखंडी रॉडनं मारहाण करण्यास सुरुवात केली. समशेर जीव वाचवण्यासाठी दोघींसमोर गयावया करू लागला. अक्षरशः तो स्वतःच्या जीवाची भिक मागत होता. पण, दोघींना काहीच भान नव्हतं. दोघींचा राग एवढा विकोलापाल गेला होता की, त्या समशेरला मारहाण करतच राहिल्या. समशेर रक्तानं माखून गेला होता. तीन मुलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण महिलांनी त्यांना दुसऱ्या खोलीत बंद करून टाकलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा समशेरला मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोकही त्यांच्या घरी पोहोचले. आतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. समशेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत समशेरचा मृत्यू झाला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही आरोपी बहिणींना अटक करण्यात आली. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
समशेर गुजरातमध्ये काम करायचा
गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, समशेर आलम गुजरातमध्ये काम करायचा. काही दिवसांपूर्वीच तो घरी परतला होता. शनिवारी भांडणाचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले, त्यावेळी त्यांना समशेरची हत्या झाल्याचं दिसलं. सध्या या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपी बहिणींना अटक केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :