Crime News : कोर्टाच्या तारखेला यायचा अन् दरोडा टाकून जायचा; चार राज्यात गुन्हे नोंद असणारी टोळी जेरबंद
Vasai Virar Crime News : पोलिसांनी अटक केलेले हे सर्व कुख्यात क्रूर दरोडेखोर आहेत. घरात दरोडा टाकण्याच्या वेळी त्या घरातील कुणी व्यक्ती उठली आणि प्रतिकार केला तर सरळ त्याची हत्या करण्यात येत असे.
Crime News : चार राज्यात दरोडा, खुन याने दहशत माजवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा कक्ष-3 च्या युनिटला मोठं यश मिळालं आहे. ही टोळी वसईतील महामार्गाजवळील एक पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत होती. मात्र, गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने यशस्वीरित्या यात सहा जणांना अटक करण्यात यश मिळवलं आहे. या टोळीत एक महिलाही आहे. या टोळीतील काहींवर मध्य प्रदेशात पाच हजार इनाम देखील आहे. दरोडा आणि हत्येसारखे गंभीर गुन्हे या टोळीवर आहेत.
पोलिसांनी अटक केलेले हे सर्व कुख्यात क्रूर दरोडेखोर आहेत. घरात दरोडा टाकण्याच्या वेळी त्या घरातील कुणी व्यक्ती उठली आणि प्रतिकार केला तर सरळ त्याची हत्या करण्यात येत असे. दरोडेखोरांच्या या टोळीला गुन्हे शाखेने यशस्वीरित्या अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात हत्या आणि दरोड्यासारखी अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. तर यातील तिघांवर तर मध्यप्रदेशात पकडण्यासाठी पाच हजारांचे इनाम देखील लावण्यात आलं आहे.
अटक आरोपीमध्ये एका महिलेचा ही समावेश आहे. मनिष उर्फ राजू मोहन चव्हाण, भाऊसाहेब शंकर गवळी, अश्विनी रुपचंद चव्हाण, रविंद्रसिंग सुखराम सोलंकी, सुखचेन रेवत पवार, मॉन्टी नंदु चौहान यांना अटक करण्यात आली आहे. रविंद्रसिंग सोलंकी, सुखचेन रेवत पवाप, मॉन्टी चौहान हे आरोपी मध्य प्रदेशातील आहेत. त्यांच्या मध्य प्रदेशात बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
5 जानेवारी 2024 रोजी ही टोळी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाड फाटा येथील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने यशस्वीरित्या यातील सहा आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून एक स्कॉर्पिओ, एक रिक्षा आणि लोखंडी कोयता, लोखंडी सळ्या, बॅटऱ्या, नायलॉनची दोरी, दोन लोखंडी कटावण्या, मिरची पूड असे दरोड्यासाठी वापरण्यात येणारे हत्यारं जप्त केली.
यावेळी आरोपींनी जोरदार प्रतिकार करत, पोलिसांवर हल्ला ही केला. यात एक पीएसआय सह दोन पोलीस कर्मचारी जखमी ही झाले. तर यात सातवा साथीदार फरार झाला. यातील राजू उर्फ मनिष चव्हाण हा मुख्य आरोपी महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील टोळी बनवून चोऱ्या करतो.
राजू चव्हाण हा 30 सप्टेंबर 2023 ला हा जेल मधून जामिनावर बाहेर आला होता. हा ज्या ठिकाणी न्यायालयात तारखेसाठी जायचा. त्या न्यायालयाच्या हद्दीत तारखेच्या आधीच्या आणि तारखेनंतरच्या रात्री टोळीच्या मदतीने चोरी करायचा. 5 जानेवारी रोजी ही तो वसई न्यायालयात तारखेला आला होता. आणि त्याने त्याच दिवशी पेट्रोल पंप लुटायचा डाव आखला होता. त्याने शहापूरला जुलै 2019 रोजी दरोड्यात दुबईचा हॉटेलव्यावसायिक सुरेश मुनजे याच्या बंगल्यावर दरोडा टाकून त्याची हत्या केली होती.
आणखी सहाजणांना अटक
या सहाजणांची टोळी पकडल्यानंतर अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका दरोड्यात या टोळीचे आणखी सहा साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. ही पारधी टोळी कुख्यात व सराईत असून, यांच्यावर महाराष्ट्र राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, तसेच मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश या ठिकाणी गंभीरस्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वेळोवेळी टोळीतील माणसं बदलून गुन्हे करत असतात. यातील महिला गाडीत बसून, आरोपीना सोडणे, त्या ठिकाणावरून आणणे, हे काम करायची आणि महिला असल्याने कुणाला संशय येत नव्हता. ज्या ठिकाणी ही टोळी दरोडा किंवा घरफोडी करण्यासाठी जायची त्याठिकाणी ते दारू ही पित होते. या जर कोणी उठला आणि समोर आला की त्याची हत्या करून,चोरी करून फरार होत होते.