नक्षलवाद्यांच्या नावाने डॉक्टरला धमकी देत मागितली 50 लाखांची खंडणी, You Tube पाहून रचला प्लॅन, तिघांना अटक
नक्षलवाद्यांच्या नावाने एमबीबीएस डॉक्टरला धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक केली आहे. लाल सलाम नक्षली संघटनेच्या नावाने डॉक्टरला धमकावत या महिलेने 50 लाख रुपये मागितले होते.
मुंबई : नक्षलवाद्यांच्या नावाने एमबीबीएस डॉक्टरला धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक केली आहे. लाल सलाम नक्षली संघटनेच्या नावाने डॉक्टरला धमकावत या महिलेने 50 लाख रुपये मागितले होते. खंडणी न दिल्यास ऑपरेशन स्टार्ट अंतर्गत डॉक्टरच्या मुलाची हत्या आणि ऑपरेशन संपन्नच्या अंतर्गत शेवटी डॉक्टरची हत्या करण्याची धमकी दिली होती. मुंबई गुन्हे शाखेनं या संदर्भात कारवाई केली असून या प्रकरणात महिला मुख्य आरोपी जिने हा कट रचला होता आणि तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे. यू ट्यूब वर व्हिडीओ पाहून हा सगळा प्लॅन केला असल्याचं समोर आलं आहे.
लाल सलाम या संघटनेच्या नावानं गोरेगाव येथील डॉक्टर वाडीलाल शहा यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. ज्यानंतर डॉक्टर शहा यांनी वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती कारण नक्षलवादी आहोत असं सांगत डॉक्टर शहा यांना एक धमकीचे पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवला. गुन्हे शाखेने या संदर्भात तपास सुरू केला.
मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई गुन्हे शाखा बाराचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या नेतृत्वात एक पथक नेमण्यात आलं. ज्यांनी युद्धपातळीवर या प्रकरणाचा तपास सुरू केला. परिसरात लागलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि येणा जाणाऱ्या वाहनांचा संदर्भ घेत तिथल्या माणसांना संदर्भात चौकशी सुरू केली. गुन्हे शाखेचा तपास अखेर नवी मुंबई आणि विरारपर्यंत पोहोचला. ज्या ठिकाणी यातील आरोपी लपले होते. गुन्हे शाखेने आरोपी बैसाखी विश्वास या महिलेला घणसोली, वाशी येथून अटक केली. तर मोहम्मद हयात शहा याला गोरेगाव मधून अटक केली तर तिसरा आरोपी विक्रांत किरट याला विरार मधून गुन्हे शाखेने अटक केली.
यू ट्यूब वर व्हिडिओ पाहून यांच्या डोक्यात हा कट रचण्याचा प्लॅन आला. त्यानंतर यांनी गोरेगाव मधील डॉक्टर वाडीलाल शहा यांना लुटण्याचा प्लॅन केला तसंच खंडणी उकळण्यासाठी एक ऑपरेशन सुद्धा राबवलं जाईल अशी धमकी डॉक्टर वाडीलाल शहा यांना देण्यात आली होती. या ऑपरेशनचे नाव ऑपरेशन स्टार्ट आणि ऑपरेशन संपन्न असं होतं. ऑपरेशन स्टार्ट म्हणजेच ऑपरेशन सुरू करत डॉक्टर वाडीलाल शहा यांच्या मुलाच्या हत्येपासून होईल तर ऑपरेशन संपन्न हे शेवटी वाडीलाल शहा यांच्या हत्येनंतर संपन्न होईल अशी धमकी यांच्याकडून देण्यात आली होती. ज्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
यातील मास्टर माईंड हयात होता आणि वाडीलाल शहा हे हयातचे फॅमिली डॉक्टर होते. वाडीलाल शहा यांची प्रॅक्टिस चांगलीच सुरु होती आणि त्यांना एकच मुलगा होता. ज्यामुळे हयातच्या डोक्यात हा प्लान आला. हयातने यासाठी त्याचा मित्र विक्रांत किरटला सोबत घेतलं आणि विक्रांतने आपली महिला मैत्रीण बैसाखीला या प्लॅनमध्ये सोबत घेतलं. विक्रांतने पत्र लिहलं होतं तर बैसाखीने हे पत्र डॉक्टरांपर्यंत पोहोचवलं होतं.
सदरची कामगिरी मिलिंद भारंबे पोलीस सहआयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (गुन्हे) दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तर महेश तावडे प्रभारी पोलिस निरीक्षक गुन्हे शाखेने बारा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.