(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime: टेम्पोला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू, पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
सदाशिव हा पुण्यातील मुळशी येथील रहिवाशी आहेत. दरम्यान, सदाशिव हा 12 ऑक्टोबरच्या रात्री भिवंडी येथून माल भरून टेम्पो घेऊन पुण्याच्या दिशेने निघाला होता.
Pune Crime: मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai- Pune Express Highway) एका मालवाहू टेम्पोला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रसायनी पोलीस ठाण्याच्या (Rasayani Police Station) हद्दीत 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही घटना घडली होती. या घटनेच्या तपासादरम्यान एक भयानक वास्तव समोर आले आहे. सदर व्यक्तीचा टेम्पोच्या आगीत जळून मृत्यू झाला नसून त्याला जाळण्यात आल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संबंधित व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसेच पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सदाशिव चिकाळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदाशिव हा पुण्यातील मुळशी येथील रहिवाशी आहेत. दरम्यान, सदाशिव हा 12 ऑक्टोबरच्या रात्री भिवंडी येथून माल भरून टेम्पो घेऊन पुण्याच्या दिशेने निघाला होता. आरोपी मल्हारी याला याची माहिती मिळताच तो त्याच्या दोन मित्रांसोबत मुंबई- पुणे एक्स्प्रेस मार्गावरून सदाशिवच्या टेम्पोचा पाठलाग केला. यावेळी, रसायनीनजीक सदाशिव याचा टेम्पो अडवून त्याला मारहाण करून बेशुद्ध केले. त्यानंतर टेम्पोला आग लावली. ज्यात सदाशिव यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आणि टेम्पोच्या केबिनमध्ये असलेल्या सदाशिवचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदाशिव यांचा जळून अक्षरशः कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटवणे पोलिसांसाठी अवघड काम होते. हे देखील वाचा- पत्नीच्या खूनात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पतीकडून पॅरोलवर बाहेर आल्यावर दुसरा खून, दोन्ही हत्येमागे चारित्र्याचा संशय
दरम्यान, या घटनेचा कसून चौकशी सुरु केली असता पोलिसांसमोर धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी मल्हारी यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध सुरु असल्याच्या संशयावरून त्याने सदाशिव यांची हत्या करण्यात आली आहे, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी मल्हारी यांच्यासह त्याच्या एका मित्राला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. तर, अन्य एका आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.