Shrish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र, मुलाने अन् सुनेने पोलीस चौकशीत काय सांगितलं?
Dr. Shrish Valsangkar Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आज मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. सोनाली यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले.

Dr. Shrish Valsangkar Solapur: सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shrish Valsangkar) यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉ. शिरीष वळसंगकर केला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्येच प्रशासकीय अधिकारी म्हणून मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने काम करत होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनीषा हिला अटक केली. सध्या मनीषा पोलीस कोठडीत आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आज मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. सोनाली यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. तसेच डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांचे जबाब देखील पोलीस नोंदवणार आहेत. तर आरोपी मनीषा मुसळे-मानेची देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान फिर्यादीचे जबाब आणि आरोपीच्या आतापर्यंत झालेल्या चौकशीतील माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
डॉ.आश्विन आणि डॉ. सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण वाढलेला-
सूत्रांच्या माहितीनुसार डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या हॉस्पिटलची पूर्ण सूत्र मुलगा डॉ. आश्विन आणि सून सोनाली यांच्यावर सोपवली होती. तर हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार या प्रशासकीय अधिकारी म्हणून आरोपी मनीषा मुसळे-माने बघत होत्या. हॉस्पिटलमधील रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभारामुळे डॉ.आश्विन आणि डॉ. सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण वाढलेला होता. त्यामुळे जानेवारी 2025 मध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्र स्वतःकडे घेतली.
कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्सबद्दल देखील चर्चा-
पुन्हा हॉस्पिटलची सूत्र शिरीष वळसंगकर यांनी घेतल्यानंतर प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहारच्या तक्रारी डॉ. वळसंगकर यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे डॉ. वळसंगकर यांनी मनीषा मुसळे-माने हिचे अधिकार कमी केले होते. याच कारणामुळे मनीषा मुसळे-माने हिने डॉ. वळसंगकर यांच्याशी वाद घातला. शिवाय ई-मेल लिहीत स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच काही महिन्यांपूर्वी डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्सबद्दल देखील चर्चा झाली होती. त्यानुसार डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही महिन्यांआधी संपत्तीचे वाटणी कशी असावी, याबाबत सविस्तर मृत्यूपत्र देखील तयार केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
























