धक्कादायक! विश्वास नांगरे पाटील अन् ईडीचे नाव घेऊन महिलेची फसवणूक; ऑनलाईन 40 लाखांचा गंडा
अलिबागमधील गोंधळपाडा येथील एक महिला घरात असताना अचानक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना अज्ञात व्यक्तीचा व्हॉट्सअॅप कॉल आला
रायगड : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बँकेतील अधिकारी बोलतोय, कस्टमर केअरमधून बोलतोय, एलआयसीमधून बोलतोय, आधार कार्ड केंद्रातून बोलतोय, लकी ड्रॉ कॉन्सर्टमधून बोलतोय, अशी बतावणी करुन सर्वसामान्यांना गंडा घालण्याचा प्रकार सर्रास घडत आहेत. त्यातच, डिजिटल इंडियात युपीआय पेमेंट आणि ऑनलाईन बँकीगच्या माध्यमातूनही लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडले आहेत. आता, अलिबागमधील एका महिलेला अशाच रितीने गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas nangare patil) यांच्या नावाचा संदर्भ देत ही फसवणूक केल्याची घटना घडल्याने पोलिसांतही (Police) खळबळ उडाली आहे. आधारकार्डचा गैरवापर झाल्याची खोटी माहिती देऊन अलिबागमधील (Alibaug) एका महिलेला आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने 40 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. शनिवारी रात्री मोबाईलवर कॉल करून ही फसवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अलिबागमधील गोंधळपाडा येथील एक महिला घरात असताना अचानक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना अज्ञात व्यक्तीचा व्हॉट्सअॅप कॉल आला. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरेटी ऑफ इंडियामधून आपण बोलत असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले, तुमच्या आधारकार्डचा गैरवापर झाला आहे. आता, तुमचा मोबाईल फोन बंद होणार असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे, याच फोनवर पोलीस अधिकारी दीक्षित मॅडम आणि विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संबधिताने संपादीत केला होता.
तुमच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, ईडी, सी.बी.आय, मुंबई पोलीस यांच्याकडील गुन्ह्यात अटक वॉरंट असल्याची भीती निर्माण केली. ईडी व इतर यंत्रणेच्या भीतीने ती महिला घाबरली आणि सगळ खरं असल्यासारखे समजून ही महिला फेक फोन कॉलच्या आरोपीच्या जाळ्यात अडकली. महिला आपल्या बोलण्यात आणि दबावत आल्याचे लक्षात येताच आरोपीने फायदा घेऊन त्या महिलेचे बँकेतील सर्व माहिती घेतली. त्यानंतर, संबंधित महिलेच्या बँक खात्यातून परस्पर ऑनलाईन 40 लाख 73 हजार 719 रुपये गायब केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलीस स्टेशन गाठून घडलेली घटना सांगितली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.
हेही वाचा