धक्कादायक! मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या आईला डॉक्टरांकडून मारहाण, नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार
यवतमाळमधील गळवा येथील मृतक श्याम ज्ञानेश्वर तिजारे हा काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता.

यवतमाळ : डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रुप मानलं जातं. कारण, अनेकदा मृत्यूच्या दाढेतून रुग्णांना बाहेर काढण्याचं काम डॉक्टरांकडून केलं जातं. त्यामुळे, गावोगावी आजही डॉक्टरांचे (Doctor) कार्य हे सेवाव्रत मानून डॉक्टरांना समाजात मानाचे स्थान दिले जाते. मात्र, काही डॉक्टरांच्या कृतीमुळे डॉक्टरी किंवा मेडीकल पेशा बदनाम झाला आहे. कोराना कालावधीत रुग्णांकडून होत असलेल्या लुटीमुळे वैद्यकीय क्षेत्र संशयाच्या भोवऱ्यात आले होते. त्यातच, यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात एका डॉक्टरांकडून रुग्णाच्या आईला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
यवतमाळमधील गळवा येथील मृतक श्याम ज्ञानेश्वर तिजारे हा काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, आज श्यामचे निधन झाले. दरम्यान, मृतक रूग्णांची आई ही डॉक्टरला बोलविण्यासाठी गेली असता दोन डॉक्टरांनी मारहाण केल्याचा आरोप अन्नपूर्णा तिजारे ह्यांनी केला आहे. तसेच दोन इंजेक्शन दिल्यामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी म्हटले. या घटनेनं शासकीय रुग्णालयात खळबळ उडाली. मृत श्यामच्या आईने मुलाचे शव ताब्यात घेण्यास नकार देत मारहाण करणाऱ्या दोन्ही डॉक्टरांचे त्वरीत निलंबित करण्याची मागणी केली आहे. श्यामच्या आईसह नातेवाईकांनीही रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांच्या निलंबानाची मागणी केली आहे.
रुग्णाला टिबी, डायबिटीज असून तीन दिवसापासून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती. दरम्यान, मृत रुग्णाच्या आईशी कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांनी गैरवर्तन केल्याची तक्रार ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी नेमण्यात आलेल्या समितीकडून करण्यात येत आहे. चौकशी अहवाल आल्यानंतरच संबंधित दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा
शॉकींग! पुण्यात दारुसाठी पोटच्या मुलानेच केला आईचा खून; माय-लेकराच्या नात्याला काळीमा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
