शॉकींग! पुण्यात दारुसाठी पोटच्या मुलानेच केला आईचा खून; माय-लेकराच्या नात्याला काळीमा
याप्रकरणी तिचा मुलगा मयूर मोहन नेटके (वय 30) आणि अल्पवयीन नातवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या अरुण वाघमारे (वय 50) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पुणे: दारुचं व्यसन सुखी संसाराला गालबोट लावतं, किंवा पती-पत्नीच्या आनंदावर विरझण टाकण्याचं काम करतं. दारुमुळे कित्येक कुटुंब उद्धस्त झाली असून अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातही (Pune) दारुच्या कारणावरुन चक्क मुलानेच आईला ठार मारल्याची घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटच्या पोराने आणि नातवाने मारहाण केल्याने साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येरवडा पोलीस स्टेशनच्या (Police) हद्दीतील कामराज नगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime news) दाखल करण्यात आला आहे. 13 मे रोजी ही घटना घडली होती. मंगल मोहन नेटके (वय 60) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा मुलगा मयूर मोहन नेटके (वय 30) आणि अल्पवयीन नातवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या अरुण वाघमारे (वय 50) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगल मोहन नेटके या कामराज नगर परिसरात राहत होत्या. 13 मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलगा मयूर नेटके याने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले. मात्र, मंगल नेटके यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून मुलाने आणि नातवाने मंगल नेटके यांना लाकडाने आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मंगल यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच 15 मे रोजी मंगल यांचा मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी खुन्हाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करत आहेत.
पोटच्या पोरानेच आईचा खून केल्याच्या घटनेने आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासण्याची घटना घडली आहे. दारुच्या व्यसनापायी माणूस कुठल्या थराला जाईल, याचा नेम नाही. संस्कृती आणि संस्काराची नगरी असलेल्या पुण्यातील या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
सुतगिरणीतील मजुराचा प्रेयसीनेच काटा काढला, बेपत्ता प्रियकराचा मृतदेह तलाव परिसरात सापडला