Santosh Deshmukh Case & Walmik Karad: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी उज्ज्वल निकमांचा पहिला युक्तिवाद, विष्णू चाटेचं नाव घेत म्हणाले...
Santosh Deshmukh Case: उज्ज्वल निकमांनी वाल्मिक कराडचा कच्चाचिठ्ठा उघडला, बीडच्या न्यायालयात युक्तिवाद सुरु झाला. पहिलं नाव विष्णू चाटेचं घेतलं, नेमकं काय घडलं?

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या सुनावणीला बीडच्या मकोका न्यायालयात सुरुवात झाली आहे. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा घटनाक्रम न्यायालयासमोर मांडायला सुरुवात केली आहे. वाल्मिक कराडचा (Walmik Karad) खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख खून (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाशी कशाप्रकारे संबंध आहे, हे उज्ज्वल निकम न्यायालयाला सांगत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरण राज्यभरात प्रचंड गाजले होते. या खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासारखा नावाजलेला वकील कोर्टात युक्तिवाद करणार असल्याने या सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
उज्ज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदाच युक्तिवाद करताना थेट वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांनी कशाप्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यामागील कारण याचा सविस्तर तपशील उज्ज्वल निकम न्यायालयासमोर मांडला. विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 तारखेला बैठक झाली होती. इथे सगळे आरोपी हजर होते. 8 डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची बैठक झाली. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा झाली. यावर 'त्याला कायमचा धडा शिकवा', असे विष्णू चाटे म्हणाल्याचा उल्लेख उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला. हा सगळा तपशील मांडल्यानंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणाची आजची सुनावणी संपली आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संतोष देशमुख यांचे अपहरण केले होते. त्यानंतर संतोष देशमुख यांना अनेक तास बेदम मारहाण करण्यात आली होती. संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी लोखंडी रॉड, फायटर आणि पाईपचा वापर करण्यात आला होता. बेदम मारहाण करण्यात आल्याने संतोष देशमुख यांच्या अंगातील रक्त साकळले होते. त्यामुळे त्यांचे अंग काळे-निळे पडले होते. संतोष देशमुख हे विष्णू चाटे आणि त्याच्या सहाकाऱ्यांना मला मारु नका, अशी विनवणी करत होते. ते पिण्यासाठी पाणी मागत होते. मात्र, विष्णू चाटे आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांच्या तोंडात लघवी केली होती. हा सगळा प्रकार सुरु असताना वाल्मिक कराड याला व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. त्याच्या सांगण्यावरुनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
वाल्मिक कराडच्या वकिलांकडून आरोपनिश्चिती करण्यास विरोध
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ही केस चार्ज फ्रेम साठी तयार असल्याचे कोर्टासमोर सांगितले. मात्र, आरोपींच्या वकिलांनी त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली. यावर आता न्यायालय काय निकाल देणार, हे बघावे लागेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याची आजची सुनावणी संपली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
