Sangli Crime : आयबी'मध्ये नोकरीचे आमिष दाखवत तिघांना 5 लाखांचा गंडा; बोगस आयबी अधिकाऱ्याला बेड्या
Sangli Crime : 'आयबी'मध्ये नोकरीचे आमिष दाखवत तिघांना पाच लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार सांगलीत समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे
Sangli Crime : आपण स्वतः आयबीमध्ये अर्थात गुप्तचर विभागात (Intelligence Bureau) आहे असे समोरच्याला भासवून आणि दुसऱ्यांना आयबीमध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून काही जणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या तोतया आयबी अधिकाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अभिषेक राजेंद्र वैद्य असे या आरोपीचे नाव असून तो सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग गावचा आहे. अभिषेकने 'आयबी'मध्ये नोकरीचे आमिष आतापर्यंत तिघांना पाच लाखांचा गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.
लातूर जिल्ह्यातील बाभळगावचे सुरेश सूर्यवंशी हे अभिषेकच्या जाळ्यात अडकले. सुरेश सूर्यवंशी यांचा पुण्यातील हिंजवडी येथे टूर्स अँड ट्रॅव्हलसचा व्यवसाय आहे. सूर्यवंशी आणि संशयित अभिषेक वैद्य यांची पुण्यातील हिंजवडीमध्ये कार चालवत असताना ओळख झाली होती. त्यावेळी वैद्यने सूर्यवंशी यांना आपण आयबीमध्ये अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अभिषेक वैद्यने सूर्यवंशी यांना इंजिनिअरिंग झालेल्यांसाठी 'आयबी'मध्ये जागा निघाल्या आहेत. तेथे नोकरी लावण्याचे आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. 'आयबी'मध्ये नोकरी केल्यास आपला फायदा होईल, असे वैद्यने सांगितले. त्यानुसार 'आयबी'मध्ये नोकरी आणि गुंतवणुकीच्या आमिषाने वैद्य याने सूर्यवंशी यांच्याकडून पुणे आणि आरग येथे 3 लाख 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर कोणतीही शंका येऊ नये यासाठी वैद्यने आयबीमध्ये नोकरी लागल्याबाबतचे वेगवेगळे बनावट ई- मेल पाठवून नोकरी लावल्याचा भास निर्माण केला.
सुरेश सूर्यवंशी यांच्यासह अमित पडसाळगे आणि संतोष दाहाळे या दोघांना देखील 'आयबी'मध्ये नोकरी लावण्याचे आमिष अभिषेक वैद्यने दाखवले. त्यासाठी वैद्यने दोघांकडून प्रत्येकी 75 हजार रुपये, असे 1 लाख 50 हजार रुपये घेतले. ती रक्कम सूर्यवंशी यांच्या खात्यावर पाठवण्यास सांगितले. त्यानंतर सूर्यवंशी यांच्या खात्यावरील तीदेखील रक्कम वैद्य याने काढून घेतली. 'आयबी'मध्ये नोकरी लागण्याच्या आशेपोटी तिघांनी अभिषेक वैद्यला पाच लाख रुपये दिले होते. परंतु तिघांना 'आयबी'मध्ये कोणत्याही प्रकारची नोकरी लागली नव्हती. संबंधित तिघांनी याबाबत वैद्य याच्याकडे वारंवार विचारणा केली. परंतु वैद्यकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेश सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.