Mutual Fund SIP : शेअर बाजारातील गुंतवणुकीनं नुकसान? 'या' म्युच्यूअल फंड SIP तून अपेक्षाभंग,कमाई ऐवजी तोटा, आता पुढं काय?
Mutual Fund SIP : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून जोरदार घसरण सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी पैसे काढून घेतल्यानं अनेक कंपन्यांचे स्टॉक्स कोसळलेत.
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण सुरु आहे. गुंतवणूकदारांना देखील मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. म्युच्यूअल फंड एसआयपीमधील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. मात्र, शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम एसआयपीमधील गुंतवणुकीवर देखील पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळं गेल्या तीन महिन्यांमध्ये म्युच्यूअल फंडमध्ये जवळपास 10 ते 15 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळं गेल्या तीन महिन्यापूर्वीपर्यंत ज्यांना एसआयपीतून काही रकमेची कमाई झाली होती. आता ती कमाई तर गुंतवणूकदारांच्या हातून गेलीच जितकी गुंतवणूक केली होती त्या देखील घसरण झाली आहे.
एसआयपीमध्ये गुंतवलेले पैसे बुडणार?
शेयर बाजारातील घसरणीमुळं एसआयपी गुंतवणूकदार देखील चिंचेत आहेत. मात्र, गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवायला हवं की एसआयपीमधील गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. जर तुम्ही एसआयपीद्वारे किमान 5 ते 7 वर्ष गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. सध्या शेअर बाजार घसरला असल्यानं त्याचा परिणाम एसआयपीवर झाला आहे. मात्र, जेव्हा शेअर बाजारात पुन्हा तेजी येईल तेव्हा तुमच्या पोर्टफोलिओचा रंग पुन्हा बदलेल.दीर्घकालीन गुंतवणूकदारांना एसआयपीमधून फायदा होत असतो.
तज्ज्ञांच्या मते सध्याच्या बाजाराच्या स्थितीत गुंतवणूकदारांनी धैर्य ठेवणं आवश्यक आहे. आर्थिक सल्लागारांच्या मतानुसार जर तुम्ही एसआयपीद्वारे नियमित गुंतवणूक करत आहात तर तुम्हाला गुंतवणूक सुरु ठेवणं आवश्यक आहे.
या म्युच्यूअल फंडमध्ये 15 टक्क्यांहून अधिक घसरण
इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार गेल्या 6 महिन्यात अनेक म्युच्यूअल फंडमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.
क्वांट ईएलएसएस टॅक्स सेवर फंड - 19.08 टक्के
क्वांट एक्टिव फंड - 18.37 टक्के
क्वांट वॅल्यू फंड - 17.82 टक्के
क्वांट फ्लेक्सी कॅप फंड - 17.69 टक्के
सॅमको फ्लेक्सी कॅप फंड - 17.65 टक्के
मोतीलाल ओसवाल फोकस्ड फंड - 17.58 टक्के
सॅमको ईएलएसएस टॅक्स सेवर फंड - 17.52 टक्के
श्रीराम फ्लेक्सी कॅप फंड - 17.21 टक्के
क्वांट मिड कॅप फंड - 17.04 टक्के
श्रीराम ईएलएसएस टॅक्स सेवर फंड - 16.70 टक्के
एनजे फ्लेक्सी कॅप फंड - 16.20 टक्के
जेएम वॅल्यू फंड - 15.61 टक्के
आईटीआई वॅल्यू फंड - 15.59 टक्के
टॉरस मिड कॅप फंड - 15.43 टक्के
क्वांट लार्ज एंड मिड कॅप फंड - 15.35 टक्के
भारतीय शेअर बाजारात घसरण होण्याची कारणं?
भारतीय शेअर बाजार घसरण्यामध्ये अनेक कारणं आहेत. यामधील प्रमुख कारणं विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री करत पैसे काढून घेण्यात आले. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये गेल्या काही काळापासून घसरण सुरु आहे. जागतिक आर्थिक धोरण अनिश्चितता, अमेरिकेकडून व्याज दरात वाढ, ट्रम्प यांची टॅरिफ लादण्याची धमकी या घटना गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहेत. याशिवाय महागाई आणि विकास दरातील घसरण यामुळं बाजाराच्या स्थिरतेवर परिणाम होत आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)