Pune Crime News: बायकोला नांदवायला पाठवत नाही; चाकूने सपासप वार करून जावयाने केली सासर्याची हत्या
Pune Crime News: कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याची हत्या केल्याची घटना पुण्यातील खडकीमध्ये समोर आली.
Pune Crime News: बायकोला नांदवायला पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने सासऱ्याची चाकूने सपासप वार करून हत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. सासऱ्याची हत्या केल्यानंतर आरोपी जावयाने थेट पोलीस ठाणे गाठले. त्याने आपला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला. आरोपीने स्वत: हून शरणगती पत्करल्याने पोलिसांनाही धक्का बसला. रमेश रामचंद्र उत्तरकर (वय 65) अशी हत्या झालेल्या सासऱ्याचे नाव आहे.
या हत्येप्रकरणी खडकी पोलिसांनी अशोक गुलाब कुडले (वय 38) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास खडकी बाजार परिसरात घडली. बस थांब्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानात घडली. हे दुकान मृत रमेश उत्तरकर यांच्या मालकीचे असल्याचे समजते. याप्रकरणी रात्री उशिरा खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2019 पासून आरोपी अशोक कुडले व त्याच्या पत्नीचा कौटुंबिक कारणातून वाद सुरू आहे. तेव्हापासून दोघेही वेगळे राहतात. आरोपी अशोक कुडले हा त्याच्या आईसोबत राहतो. तर त्याची पत्नी तिच्या वडिलांकडे राहते. दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत.
दोघांचा कौटुंबिक वाद न्यायालयात सुरू आहे. कुडले हा पत्नीला नांदायला पाठवा असे सांगत होता. तर सासरे घटस्फोट घेण्याचे सांगत होते. त्यातून दोघांत वाद सुरू होते. बुधवारी कोर्टात तारीख होती. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर सासरे उत्तरकर आणि जावई अशोक कुडले यांच्यात वाद झाले. उत्तरकर सायंकाळी साडे सातच्या सुमारास कपड्याच्या दुकानात बसले होते. त्यावेळी कुडले याने तेथे येऊन धारधार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. उत्तरकरांवर सहा ते सात वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आणि जागेवर त्यांनी प्राण सोडले. त्यानंतर आरोपी कुडले हा चाकू हातात घेऊन स्वतः खडकी पोलीस ठाण्यात हजर झाला. आरोपी कुडकेच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी उत्तरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. उत्तरकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णलयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.