(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात मद्यधुंद कारचालकाने धडक दिल्याने चार्टर्ड अकाऊटंटचा मृत्यू
पुण्यातील चंदननगर परीसरात मद्यधुंद कारचालकाने धडक दिल्याने चार्टर्ड अकाऊटंटचा मृत्यू झाला आहे.घटनेनंतर अटक झालेल्या आरोपीला एका दिवसात जामीन मिळाला आहे.
पुणे : पुण्याच्या चंदननगर परिसरात शनिवारी रात्री एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून तिघांना जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार्टर्ड अकाऊटंटचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकुर खंडेलवाल (वय 38) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी कार चालक जोविमसन जेम्स (वय 30) याला अटक केली होती. त्यानंतर कोर्टातून त्याला एका दिवसात जामीन मिळाला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की मृत अंकुर खंडेलवाल हे चंदननगर परीसरातील कुमार पिपरा सोसायटीत राहतात. शनिवारी रात्री ते पत्नी आणि मुलासह शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी परत जात असताना हा अपघात घडला. खंडेलवाल दाम्पत्य हे फुटपाथवरून जात असतानाही भरधाव वेगात आलेल्या गाडीने त्यांना जोराची धडक दिली. त्यानंतर ही गाडी पुढे जाऊन एका भिंतीला धडकली. ही धडक एवढी जोरात होती की सिमेंटची भिंत जमीनदोस्त झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अंकुर खंडेलवाल यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक जोविमसन जेम्स याला अटक केली. मद्यधुंद अवस्थेत तो कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता काही तासात त्याला जामीनही मिळाला. परंतु, त्याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून ज्या व्यक्तीला धडक दिली होती. तिचा मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
अंकुर खंडेलवाल अवघ्या 38 वर्ष वयाचा होता. त्याच्या मागे पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या मृत्यूने खंडेलवाल कुटुंबियांवर मात्र आभाळ कोसळले आहे. आरोपीला आता कठोरात काठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी खंडेलवाल कुटुंबियांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.