Pune crime news: जिथे कोयते उगारले त्याच जागेवरुन पोलिसांनी भाईंची 'वरात' काढली, पुण्यातील कोयता गँगचा माज उतरवला
Pune Crime News: तातडीने कारवाई करत पोलिसांनी सर्व सात आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि तीन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत.

Pune Crime: पुण्यात कोयता गँगची दहशत कायम चर्चेत असते. औंध भागात कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवणाऱ्या सात जणांच्या टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ज्या भागात या टोळीने कोयत्याने हल्ला केला, त्याच भागातून पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली.
नेमकं प्रकरण काय?
औंध भागात कोयत्याचा उपद्रव करणाऱ्या टोळीविरोधात चतु:शृंगी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सात जणांच्या टोळीने 28 जून रोजी रात्री 12.15 वाजता काही तरुणांवर कोयत्याने आणि काठ्यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध परिसरात झालेल्या हल्ल्याचा उगम पूर्ववैमनस्यातून झाला होता. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तातडीने कारवाई करत पोलिसांनी सर्व सात आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि तीन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: प्रतीक सुनील कदम (26), अमीर अल्लाउद्दीन शेख (28), अतुल श्याम चव्हाण (27), रॉबिन दिनेश साळवे (26), समीर अल्लाउद्दीन शेख (26), जय सुनील गेंगाट (21), अभिषेक अरुण आवळे (24)
पोलिसांचा अधिक तपास सुरु
हल्ल्यात वापरलेले कोयते आणि गावठी कट्टा जप्त केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक खोलात सुरू केला आहे. या टोळीचे इतर गुन्हे आणि संभाव्य संपर्कही तपासले जात आहेत. चतु:शृंगी पोलिसांनी या कारवाईद्वारे एक कडक संदेश दिला असून, शहरात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही, हे स्पष्ट केलं आहे.
























