पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट, ससून रुग्णालयाची SIT कडून 8 तास कसून चौकशी
Pune Car Accident : ससून रुग्णालयात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी समिती राज्य सरकारकडे अहवाल सुपूर्द करणार आहे.
पुणे : पुणे कल्याणीनगर कार अपघात (Pune Car Accident) प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. धनिक पुत्राने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कारने दोघांना चिरडले. यानंतर बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) रिपोर्ट बदलण्यात आले. ससून रुग्णालयात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी समिती राज्य सरकारकडे अहवाल सुपूर्द करणार आहे.
पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट
ससून रुग्णालय प्रकरणातील SIT समिती अहवाल तयार करून राज्य सरकारला सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात ससूनचे दोन डॉक्टर अटकेत आहेत. या डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल फेरफार केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयाची 8 तास चौकशी
दरम्यान, या प्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारने तीन जणाची एसआयटी समिती नेमली आहे. यामधे डॉ. पल्लवी सापळे, डॉ. सुधीर चौधरी आणि डॉ. गजानन चव्हाण यांचा समावेश आहे. ही त्रिसदस्यीय समिती मंगळवारी चौकशीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये पोहचली होती. मंगळवारी दिवसभर झालेल्या चौकशीचा अहवाल समिती राज्य सरकारला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
SIT समितीकडून कसून पाहणी
ससून रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात जाऊन SIT समिती अध्यक्ष डॉ. पल्लवी सापळे आणि पथकाने पाहणी केली. पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला ससूनच्या ज्या कक्षात आणलं होतं, त्याची पाहणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया फॉलो करताना त्या मुलाची नोंदणी ज्या रजिस्टरमध्ये केली होती, त्यांच्या नोंदी चौकशी पथकाने घेतल्या.
SIT चौकशीचा अहवाल राज्य सरकारकडे सोपवणार
या सोबतच ज्या बेडवर झोपवून आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले. त्या बेडची, कक्षाची आणि तिथल्या सीसीटीव्हीची ही पाहणी पथकाने केली. ससून रुग्णालय चौकशी समितीने जवळपास 8 तास चौकशी केली. ससून रुग्णालयीचे डीन डॉ. विनायक काळे यांच्या केबिनमध्ये कामकाज सुरू होते. समितीकडून ससून रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ब्लड लॅबच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. समितीने ब्लड लॅबचीही पाहणी केली. आता या सर्व तपासणी आणि चौकशीचा अहवाल राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :