(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tarapur : तारापूरमध्ये केमिकल कारखान्यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू; कारखान्यातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर!
Palghar News : तारापूरमधील केमिकल कंपनीत झालेल्या आगीत होरपळून एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या निमित्ताने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Palghar News : तारापूर (Tarapur) औद्योगिक क्षेत्रातील ग्लेनफिन केमिकल कारखान्यात झालेल्या अपघातात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी 20 वर्षीय विशाल सरोज या कामगाराचा होरपळून मृत्यू झाला.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात दिवसेंदिवस आगीच्या घटनामध्ये वाढ होत आहे. त्यात निष्पाप कामगारांचा बळी जात आहे. परंतु ह्या घटनांकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने तसेच कारखान्याचे मालक , व्यवस्थापन यांच्या दुर्लक्ष व असुरक्षितेमुळे ह्या घटना घडल्याचे स्थानिक पातळीवर आरोप केले जात आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक टी-127 मेसर्स ग्लेनफिन केमिकल कारखान्यात एका कामगाराचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार, 19 जानेवारी रोजी रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान ट्रे डायर मध्ये आग लागून अनुराग पाल (18 वर्ष) आणि विशाल सरोज (20 वर्ष) हे दोन्ही कामगार आगीत होरपळून भाजले होते. त्यांना तात्काळ तुंगा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. परंतु या दोन्ही कामगारांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्यामुळे रबाळे येथील नॅशनल बर्न इस्पितळात दाखल करण्यात आले.
या आगीत अनुराग पाल हा 30 टक्के आणि विशाल सरोज 68 टक्के भाजल्याचे औद्योगिक सुरक्षा अधिकारी हिम्मतराव शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे सांगितले होते. 26 जानेवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजता आगीत होरपळून 68 टक्के भाजलेला कामगार विशाल सरोज याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कारखान्यात कामगारांना पुरेशी सुरक्षा उपकरणे पुरविले जात नसून कारखान्यात प्रशासनाची हलगर्जीपणामुळे कामगारांच्या जीवावर बेतले आहे.
सदर प्रकरणाची माहिती कारखान्यामधून मिळालेली आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याची कसून चौकशी केली जाईल असे औद्योगिक सुरक्षा अधिकारी हिंमतराव शिंदे यांनी म्हटले.