India: देशात तीन वर्षांत 13 लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता; 'या' राज्यातील आकडा सर्वाधिक
Number of Missing Women in India: केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या आठवड्यात संसदेत बेपत्ता मुली आणि महिलांशी संबंधित डेटा सादर केला आहे. ही आकडेवारी 2019 ते 2021 पर्यंतची आहे.
Missing Women in India: भारतात मुलींशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. यातील केवळ काही प्रकरणं पोलीस ठाण्यात पोहोचतात, तर काहींची नोंद देखील होत नाही. काही प्रकरणं समोर येत नाहीत. कधी मुलीवर बलात्कार होतो, तर कधी अपहरण… 2019 ते 2021 या तीन वर्षांच्या कालावधीत भारतात बेपत्ता झालेल्या महिलांची (Missing Women) संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. केवळ तीन वर्षांत भारतातील 13.13 लाख मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. यातील बहुतांश मुली आणि महिला मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) बेपत्ता झाल्या आहेत. मध्य प्रदेशनंतर सर्वाधिक मुली या पश्चिम बंगालमधून बेपत्ता झाल्या आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत केली आकडेवारी सादर
केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या आठवड्यात संसदेत आकडेवारी सादर केली, त्यानुसार 2019 ते 2021 या तीन वर्षांच्या काळात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 10 लाख 61 हजार 648 मुली भारतातून बेपत्ता झाल्या आहेत. याशिवाय, याच काळात भारतातून 18 वर्षांखालील 2 लाख 51 हजार 430 मुली बेपत्ता झाल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) ही आकडेवारी जाहीर केली आहे.
कोणत्या राज्यातून सर्वाधिक मुली बेपत्ता?
संसदेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 ते 2021 दरम्यान मध्य प्रदेशातून सर्वाधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. या तीन वर्षांच्या काळात मध्य प्रदेशातून 1 लाख 60 हजार 180 महिला आणि 38 हजार 234 मुली बेपत्ता झाल्या आहेत. याच कालावधीत पश्चिम बंगालमधून 1 लाख 56 हजार 905 महिला आणि 36 हजार 606 मुली बेपत्ता झाल्या आहेत.
महाराष्ट्रातून किती महिला आणि मुली बेपत्ता?
याशिवाय महाराष्ट्रातून 1 लाख 78 हजार 400 महिला आणि 13 हजार 33 मुली बेपत्ता झाल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) ही आकडेवारी जाहीर केली आहे.
इतर राज्यांतून किती महिला आणि मुली बेपत्ता?
2019 ते 2021 या तीन वर्षांच्या कालावधीत ओडिशातून 70 हजार 222 महिला आणि 16 हजार 649 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्याचप्रमाणे छत्तीसगडमधून 49 हजार 116 महिला आणि 10 हजार 187 मुली बेपत्ता झाल्या आहेत.
दिल्लीचे आकडे काय सांगतात?
संसदेने जाहीक केलेल्या आकडेवारीनुसार, केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. येथून बहुतांश महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत दिल्लीतून 61 हजार 54 महिला आणि 22 हजार 919 मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर जम्मू-काश्मीरमध्ये याच काळात 8 लाख 617 महिला आणि 1 लाख 148 मुली बेपत्ता झाल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :