संतापजनक! येवल्यात तरुणाला पट्ट्याने बेदम मारहाण, सोशल मिडियावर Video Viral
Nashik Crime News : नाशिकच्या येवला तालुक्यात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime News नाशिक : एका तरुणाला ताब्यात घेत अर्धनग्न करून एका खोलीत नेवून पट्ट्याने जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना सोशल मीडियावर (Social Media) टॅग देखील करण्यात आला आहे. या व्हिडिओची सत्यता तपासली असता येवला (Yeola) शहरातील हा व्हिडिओ असून मारहाण झालेल्या पीडित व्यक्तीचे नाव प्रसाद खैरनार असे आहे. या मारहाणी प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात (Yeola Police Station) 363 कलमान्वये गुन्हा दाखल असून पोलीस मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहे. या घटनेप्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेने मारहाण करणाऱ्या संशयितांवर तातडीने कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या येवला तालुक्यात एका दलित समाजाच्या तरुणाला अर्धनग्नावस्थेत जबर मारहाण केल्याची संतापजनक घटना उघककीस आली असून आरोपी अद्याप मोकाट आहेत. ही घटना 17 जून रोजी घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेबाबत पीडित कुटुंबीयांनी गावगुंडांच्या धाकापोटी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र सामाजिक कार्यकर्त्याने धीर दिल्यानंतर पीडित कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर मारहाणीचा व्हिडिओ ऑल इंडिया पँथर सेनेकडून ट्विट करण्यात आला आहे.
येवल्यातील तरुणाला बेदम मारहाण
ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, येवल्यात एका दलित तरुणाला झुंडीने अमानवीय मारहाण करण्यात आली. या तरुणाला त्याच्या एका मैत्रिणीने हाताला लागल्याचे कारण देत खाऊ गल्लीत बोलावले होते. हा तरुण तिथे पोहोचल्यानंतर गुंडांनी त्याचे अपहरण करून त्याला जबर मारहाण केली. या घटनेचा त्यांनी एक व्हिडिओही काढला. त्यांनी त्याचा मोबाइल हिसकावून घेतला, असे त्यांनी म्हटले आहे.
...तर राज्यव्यापी आंदोलन छेडणार
तसेच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपींना अटक करावी. तसेच पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे. पीडित तरुण भयभीत झाला असून, त्याची जगण्याची उमेद संपली आहे. त्याला वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. त्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी दीपक केदार यांनी केली असून आरोपींना अटक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आणखी वाचा
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश