नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
Nashik Hit and Run : दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना नाशिकच्या चांदवड - मनमाड रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला उडवल्याचा प्रकार घडला आहे.
मुंबई : मद्यसाठा घेवून धावणाऱ्या अज्ञात वाहनाचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) सरकारी वाहन उलटल्याचा प्रकार चांदवड-मनमाड रोडवरील हरनुल टोलनाक्याजवळ घडला. या अपघातात राज्य उत्पादन शुल्कचा एक कर्मचारी जागीच ठार तर दोघे पोलीस (Police) जखमी झाले आहेत. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये घडलेल्या हिट अँड रन (Nashik Hit And Run) प्रकरणाची दखल आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी घेतली आहे. यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुजरात राज्याच्या सिल्व्हासा येथून नवसारी येथे अवैध दारूसाठा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिकच्या पथकाने लासलगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत चांदवड-मनमाड रोडवर पाठलाग सुरू केला. यावेळी हरनूल शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवण्याचा करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्या वाहनाने धडक दिल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाहन रस्त्याच्या कडेला शेतात उलटले. या अपघातात चालक कैलास कसबे जागीच ठार झाला. तर तीन कर्मचारी जखमी झाले. अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनाला पकडण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.
कठोर कारवाई करणार : शंभूराज देसाई
या प्रकरणावर शंभूराज देसाई म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या दोन टीमला विदेशी बनावटीची दारू एका वाहनात असल्याचा माहिती मिळाली. त्यानंतर ते या वाहनाचा पाठलाग करत होते. पण टीमवर हल्ला करण्यात आला. यामध्ये एक कर्मचारी मृत्युमुखी पडला तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आम्ही संबंधित मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला विभागाकडून मदत देऊ. पण आमची जी मोहीम सुरू आहे ती अशीच सुरु राहील. कर्तव्य बजावत असताना कर्मचार्याचा जीव घेणं योग्य नाही. यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. ती गाडी अजूनही मिळाली नाही, पोलीस गाडीचा शोध सुरू आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
पळालेल्या वाहनाचा शोध सुरु
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली तर अपघातातील मयत चालकाच्या मृतदेहावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान पळून गेलेल्या वाहनांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
दापोडीत पोलिसांना धडक देणाऱ्या कारचालकाचं नाव उघड, भरधाव स्विफ्टच्या धडकेत समाधान कोळींचा मृत्यू