Nashik Crime: सासरच्या छळाला कंटाळून कल्याणीने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं, घराच्या अंगणातच सरण रचलं, चिमुरड्या मुलाने दिला अग्नी
Nashik Crime: तिच्या पतीने आणि सासरच्यांनी तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

Nashik Crime: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरातून विवाहितांचा सासरहून झालेला छळ आणि त्यातून आत्महत्येच्या धक्कादायक घटना समोर आल्या. या घटना ताज्या असतानाच नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरीतील 35 वर्षीय विवाहित तरुणीनं सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. महिलेच्या आत्महत्येनंतर संतप्त नातेवाईकांनी मृत महिलेचा अंत्यविधी सासरच्या अंगणातच केला असून तिच्या 10 वर्षांच्या मुलानं तिच्या चितेला भडाग्नी दिला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहादुरी गावातील वर्षीय कल्याणी संतोष शिरसाठ या विवाहित महिलेने सासरच्यांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह सासू-सासऱ्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी हिचा विवाह 2014 साली संतोष शिरसाठ याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व सुरळीत होतं. मात्र, पुढे वेळोवेळी सासरच्या मंडळींकडून तिला त्रास दिला जात असल्याचं तिच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. तिच्या पतीने आणि सासरच्यांनी तिला वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. याच छळाला कंटाळून शनिवारी (दि. 19 जुलै) कल्याणीने घराशेजारील विहिरीत उडी घेत आपलं आयुष्य संपवलं.
या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून पती संतोष शिरसाठ, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. कल्याणीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. दरम्यान, कल्याणीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. त्यांनी रविवारी (दि. 20) कल्याणीच्या सासरच्या घराच्या अंगणातच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. सासरच्या लोकांविरोधात संतप्त झालेल्या विवाहितेच्या नातेवाईकांनी सासरच्या अंगणातच सरण रचले आणि अंत्यसंस्कार केले. यावेळी तिचा पती, सासू आणि सासरे हजर नव्हते. कल्याणीच्या दहा वर्षांच्या मुलाने आईच्या चितेला भडाग्नी दिला. गावात हळहळ व्यक्त होत असून, महिला अत्याचाराच्या या प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.























