Nashik : तोतया तहसीलदार बनून आला अन् कपडे, भांडे, पैसे लुटून गेला; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Nashik News : एका 'तोतया' तहसीलदाराने नाशिकच्या चांदवडमधील दुकानदारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Nashik Crime News : मी नव्यानेच चांदवड (Chandwad) शहरात तहसीलदार म्हणून आलो आहे. कार्यक्रमासाठी कपडे, भांडे घ्यायचे आहे, असे विश्वासाने दुकानदाराला (Shopkeeper) सांगण्यात आले. दुकानदाराकडून चार पैठणी, चार रेडिमेड सूट व तब्बल 25 हजार रुपयांचे भांडे अशा एकूण 60 ते 70 हजार रुपयांचे साहित्य घेवून पैसे थोड्या वेळात माणसाबरोबर पाठवतो असे म्हणत एका 'तोतया' तहसीलदाराने (Fake Tehsildar) नाशिकच्या (Nashik Crime News) चांदवडमधील दुकानदारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक व्यक्ती चांदवड शहरातील कपड्याच्या दुकानात शिरला. चांदवड शहरात मी नवीन तहसीलदार म्हणून असल्याची बतावणी करत कपडे घायचे असल्याचे दुकानदाराला सांगितले. दुकानदाराने त्या व्यक्तीला पाच हजार रुपयांच्या कपडे दाखवले.
25 हजार रुपयांचे भांडे घेतले
तोतया तहसीलदाराने दुकानातून चार पैठणी साड्या, चार पॅन्ट आणि शर्ट, घेतले. त्यानंतर तोतया तहसीलदाराने माझा माणूस पैसे घेऊन येईल, अशी बतावणी केली आणि भांड्याच्या दुकानात निघून गेला. भांड्याच्या दुकानाचा मालक दत्ता गांगुर्डे (Datta Gangurde) यांना त्याने विश्वासात घेतले. गांगुर्डे यांच्याकडून तोतया तहसीलदराने कुकर, मिक्सर, सॉरी, कढई, चमचे, तवा, कप बॉक्स असे एकूण 25 हजार रुपयांचे भांडे घेतले.
दुकानदाराकडून घेतली 10 हजारांची रोख रक्कम
त्यानंतर तोतया तहसीलदाराने स्वयंपाकी यास 10 हजार रुपये द्यायचे आहे. त्यासाठी दुकानदाराकडून 10 हजार रुपये रोखही घेतले. थोड्या वेळात पैसे देतो असे सांगून तोतया तहसीलदाराने दुकानातून पळ काढला. कपडे, भांडे घेऊन गेलेला तोतया तहसीलदार परत आलाच नाही म्हणून दोन्ही दुकानदारांनी त्यांचा शोधाशोध केली.
दुकानदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात धाव
तोतया तहसीलदार आढळून न आल्याने आपली फसवणूक (Cheating) झाल्याचे दुकानदारांना लक्षात आले. त्यानंतर भांडे दुकानदार दत्ता गांगुर्डे यांनी चांदवड पोलीस ठाणे (Chandwad Police Station) गाठले आणि तक्रार दाखल केली. हा संपूर्ण प्रकार ऐकून पोलीसदेखील चक्रावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे तोतया तहसीलदाराचा शोध घेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या