तब्बल 25 जणींशी लग्न केलं, लाखो रुपयांना लुटलं; नालासोपाऱ्यातील 'लखोबा लोखंडे' पोलिसांच्या ताब्यात
Nalasopara Lakhoba Lokhande : मॅरेज ब्युरोच्या संकेतस्थळावरून महिलांना हेरून त्यांच्याशी लग्न करायचं आणि नंतर त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारून फरार व्हायचं असा या ठगाचा धंदा होता.
पालघर : लग्न जमवणाऱ्या संकेतस्थाळावरुन विधवा, घटस्फोटीत महिलांना हेरून त्यांच्याशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणारा नवा लखोबा लोखंडे (Nalasopara Lakhoba Lokhande) नालासोपारा पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. अटक केली आहे. यांने एक दोन नव्हे तर 25 महिलांशी लग्न करुन त्यांना फसवल्याच निष्पन्न झालं आहे. फिरोज नियाज शेख (वय 43) असं त्याचं नाव आहे.
'तो मी नव्हेच' या प्रभाकर पणीशकरांच्या जुन्या नाटकातील लखोबा लोखंडे हे पात्र भलतच प्रसिद्ध झालं. अनेक महिलांना फसवायचं, त्यांच्यासोबत लग्न करायचं आणि त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारून फरार व्हायचं हा त्याचा धंदा. अनेकजणींना फसवणारा हा नाटकातला लखोबा लोखंडे आता नालासोपारात अवतरलाय. या लखोबाने एक-दोन नव्हे तर तब्बल 25 वेळा लग्न केलं आणि या सर्व पत्नींना अक्षरशः लाखो रुपयांना गंडवलं. याच 25 लग्नांमधली एक बेडी मात्र त्याला गजाआड होण्यास कारणीभूत ठरली.
सहावेळा तुरुंगवारी, तरीही सुधारला नाही
आजवर हा लखोबा सहा वेळा तुरुंगात जाऊन आला. मात्र त्यानंतरही त्याचे कारनामे सुरुच राहिले. याआधी त्यानं 2015 मध्ये पुण्यातील चार महिलांना हेरून असंच लग्न केलं होतं. त्यानंतर तो 2023 मध्ये सहा वेळा तुरुंगात जाऊन आला. मात्र त्यानंतरही त्यानं फसवणूक सुरू ठेवली. फिरोजने अशी एकूण 25 लग्न केल्याचं समोर आलं.
महिलेची पोलिसात तक्रार
नालासोपारात राहणाऱ्या एका महिलेशी फिरोजनं लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख वाढवली आणि तिच्याशी लग्नही केलं. तिच्याकडून लॅपटॉप आणि कार घेण्यासाठी 6 लाख 50 हजार घेतले आणि पसार झाला.
फसवणूक झाल्याचं त्या महिलेच्या लक्षात आलं. या महिलेनं पोलिस ठाणं गाठलं आणि पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला. मात्र त्याचा नंबर नसल्याने पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांनी एक फेक महिलेची प्रोफाईल बनवून त्याला भेटायला भेटायला बोलावलं. तो कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केलं.
फिरोजकडून पोलिसांनी 3 लाख 21 हजार 490 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यात अनेक महिलांचे एटीएम कार्ड, चेकबुक, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, सोने-चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.
मिळालेल्या मुद्देमालावरून फिरोजनं किती जणींना गंडवलं असेल याचा अंदाज पोलिसांना आला. हा लखोबा मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांना हेरत होता. त्यांच्याशी लग्न करायाचा, त्यांचे सर्व सोन्याचांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार व्हायचा. हीच त्याची गुन्हा करण्याची पद्धत होती.
फिरोजविरोधात आतापर्यंत फसगत झालेल्या महिलांपैकी कुणीही पोलिसांत तक्रार दिली नव्हती. बदनामीची भीती आणि समाजात आयुष्य एकाकी काढण्याचं आव्हान यामुळे या महिलांनी शांत राहणंच पसंत केलं. मात्र नालासोपाऱ्यातील महिलेनं धाडस दाखवलं आणि हा लखोबा तुरुंगाशी चतुर्भुज झाला.
ही बातमी वाचा: