पठ्याने एक दोन नव्हे चक्क 111 दुचाकी चोरल्या; नऊ जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून वाहनांची चोरी
Nagpur Crime News : जवळपास 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अनेक दिवस तपासल्यानंतर नागपुरातून बेपत्ता होणाऱ्या वाहनांच्या मागे एकच चोर असल्याची शंका पोलिसांना आली.
Nagpur Crime News : नागपुरात एका चोरानं एक दोन नव्हे तर 111 दुचाकी चोरल्याची घटना घडलीय. गेल्या अनेक दिवसांपासून नागपुरात (Nagpur) वाहन चोरीच्या (Vehicle Theft) घटना वारंवार घडत होत्या. त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेला ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या चोराला ताब्यात घेऊन सर्व दुचाकी जप्त केल्यात. ललित भोगे (वय 24 वर्ष) असे या आरोपीचे नाव आहे.
नागपूर पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून दहा किंवा वीस नाही, तर तब्बल 111 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांकडून याबाबत तापस केला जात असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाला ललित भोगे याने अनेक दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने शहरातील वेगवेगळ्या भागातील तब्बल 111 दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी चोरी गलेल्या सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी जवळपास 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले...
लिलत भोगे हा नागपूर जिल्ह्याच्या आजूबाजूला असलेल्या नऊ जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चोरी करायचा. त्यानंतर चोरीचे वाहनं ग्रामीण भागामध्ये विकायचा. गेले काही महिने नागपूर शहरात सातत्याने वाहन चोरीच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलीस सातत्याने सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत होते. जवळपास 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अनेक दिवस तपासल्यानंतर नागपुरातून बेपत्ता होणाऱ्या वाहनांच्या मागे एकच चोर असल्याची शंका पोलिसांना आली. पोलिसांनी गोपनीय पद्धतीने या आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा ललित भोगे नावाचा हा चोर सध्या नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अन् तब्बल 111 दुचाकी चोरल्याचे आले समोर...
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ललितला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने अमरावती जिल्ह्यातील वरुड या मूळ गावात 20 दुचाकी ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वात आधी त्या 20 दुचाकी जप्त केल्या. त्यानंतर या सराईत चोराच्या पुढील चौकशीत आणखी 91 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले. खास बाब म्हणजे 24 वर्षांचा हा सराईत चोर फक्त बारावी उत्तीर्ण आहे. मात्र, त्याला ऑटोमोबाईल क्षेत्राची खडा न खडा माहिती आहे. आपल्या याच ज्ञानाच्या आधारावर तो बनावट किल्लीचा वापर करून किंवा दुचाकीचा हँडल तोडून शिथाफीने दुचाकी चोरायचा.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nagpur News : धक्कादायक! नागपूर बस स्थानकातील बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; परिसरात एकच खळबळ