(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime News : खळबळजनक! दारूसाठी पैसे न दिल्याने मित्रालाच संपवले
Nagpur Crime News: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. उपराजधानी नागपुर शहरात एकापाठोपाठ एक हत्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे.
Nagpur News नागपूर : उपराजधानी नागपूर शहरात एकापाठोपाठ एक हत्यांचे (Nagpur Crime News) सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारताच अवघ्या 12 तासात नागपूर शहरमध्ये दुहेरी हत्याकांड घडलं होते. त्यानंतर आता केवळ दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कपिलनगर पोलीस ठाण्यांतर्गत (Nagpur Police) शुक्रवारी रात्री सन्यालनगर टेकानाका येथे घडली. या घटनांमुळे शहर हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
किरकोळ वाद शिगेला, मित्राचीच केली हत्या
पूर्व नागपुरातील वाठोडा खरबी परिसरात आर्थिक वादातून मित्रानेच भरदिवसा दोन जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. भरदिवसा झालेल्या हा हत्येमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले होते. आता पुन्हा एका किरकोळ कारणावरून मित्राने आपल्या मित्राचीच हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगेश गणेश मेंढे (45, रा. उन्नती कॉलनी, कपिलनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दत्तू उर्फ दत्त्या राहुल रमेश रामटेके (19, मानवनगर, टेकानाका) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मंगेश मेंढे हा रेतीचा व्यवसाय करत असून त्यांची दत्तूसोबत मैत्री होती.
दरम्यान, हे दोघे सोबत काम देखील करत होते. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान मंगेश आपल्या घरी जाताना दत्तू त्याला भेटला. त्याने मंगेशकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र मंगेशजवळ पैसे नसल्याने त्याने पैसे दिले नाहीत. दरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि हा वाद फार विकोपाला गेला. याच वादातून संतप्त झालेल्या दत्तूने आपल्या जवळील चाकू काढून मंगेश यांच्या डाव्या बाजूला छातीवर तीन वार केले. यात मंगेश गंभीर जखमी झाला.
उपचारापूर्वीच मृत्यू
वार केल्यानंतर दत्तूने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत मंगेश बराचवेळ तसाच पडून होता. त्यानंतर नागरिकांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली आणि मंगेशला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दत्तू यास अटक केली आहे.
मृत मंगेश आपली पत्नी आणि दोन मुलांसह उन्नती कॉलनीत राहत होता. किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच नागपूर शहरात नव्यानेच रुजू झालेले पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यापुढे खुनांची मालिका थांबविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या