(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime News: आर्थिक वादातून दोघांची दिवसाढवळ्या हत्या; नागपुरच्या वाठोडा परिसरातील घटना
Nagpur Crime News : आर्थिक वादातून एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि त्याच्या मित्राची दिवसाढवळ्या हत्या केल्याची धक्कादायक घटना पूर्व नागपुरातील वाठोडा खरबी परिसरात घडली.
Nagpur News नागपूर : आर्थिक वादातून एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि त्याच्या मित्राची दिवसाढवळ्या हत्या केल्याची धक्कादायक घटना पूर्व नागपुरातील (Nagpur Crime News)वाठोडा खरबी परिसरात घडली. ही घटना गुरुवारी रात्री वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत साईबाबानगरात घडली असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सनी धनंजय शिरूडकर (33 जलालपुरा, गांधीबाग) आणि कृष्णकांत ऊर्फ कुन्नु भट (24) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत, तर किरण शेषराव शेंडे (24) त्याचा भाऊ योगेश शेंडे (20) विक्की राजकुमार कोहळे (20) आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
सनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून त्याने मृत किरण शेंडेलाला इएमआयवर वाहन खरेदी करण्यात मदत केली होती. मात्र, किरण त्याच्या ईएमआय भरण्यात अयशस्वी ठरल्याने, सनीला फायनान्स फर्मकडून फोन येऊ लागले. त्यामुळे खरबी येथील साईबाबा नगर येथे त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका चिघळला की किरणने दगड आणि काठ्यांनी दोघांवर हल्ला (Crime) केला, दरम्यान यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी किरण शेंडेसह यातील सर्व संशयित आरोपींना वाठोडा पोलिसांनी(Nagpur Police) अटक केली आहे असून पुढील तपास सुरू केला आहे.
आर्थिक वाद चिघळला आणि दगडाने ठेचून झाली हत्या
नागपुरात दिवसाढवळ्या झालेल्या दुहेरी हत्याकांडमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र गतिमान करत या प्रकरणातील मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अवघा काही तासात अटक केली आहे. या प्रकरणातील सूत्रधार असलेले शेंडे बंधू काही दिवसांपूर्वी या घटनेतील मृत ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सनी शिरूडकरच्या घराजवळ किरायाने राहायला आले होते. त्यामुळे सनीसोबत त्यांची मैत्री झाली होती.
दरम्यान सनीने वाहन खरेदी करण्यासाठी किरण शेंडेला आर्थिक मदत करत किस्तीवर बाईक मिळवून दिली होती. त्याशिवाय काही उसने पैसेही दिले होते. कालांतराने किरणने ईएमआय भरणे अपेक्षित होते. मात्र त्याने वेळेवर पैसे न भरल्याने फायनान्स कंपनीने सनीला फोन करून पैशांसाठी तगादा लावला. या विषयी किरणला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर देत वेळ मारून नेली, मात्र हे प्रकरण अधिक वाढत गेल्याने या दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान हा वाद इतका चिघळला की किरणने त्यांची हत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.
मारेकऱ्यांना अवघ्या काही तासात अटक
गुरुवारी, 1 जानेवारीच्या रात्री शेंडे बंधूंनी सनीला घराजवळ येण्यास सांगितले. दरम्यान त्याच्यात पुन्हा वाद उफाळून आला. वाद मिटविण्याच्या उद्देशाने सनीचा मित्र कुन्नु भट आणि मनीष मोहिते यांनी मध्यस्थी केली. मात्र किरणने पैसे परत करण्यास नकार दिल्याने त्यांच्यात अधिक वाद वाढून दोघांमध्ये मारहाण झाली. दरम्यान त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सेंट्रिंगच्या राफ्टरने सननी आणि कुन्नुवर हल्ला केला. दगडाने त्यांचे डोके ठेचून त्यांना गंभीर जखमी केले. यात कुन्नुचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तर सनीला रुग्णालयात नेत असतांना वाटेत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सीसीटीव्हीद्वारे सनी आणि कुन्नुची ओळख पटवून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सनीचा मित्र मनीष मोहिते घरी परतला होता. दरम्यान त्याने या घटनेबाबत सनीच्या कुटुंबीयांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी गाठल्यानंतर त्यांना सत्यस्थिती समजली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ मारेकऱ्यांचा शोध घेत त्यांना अवघ्या काही तासात अटक करून पुढील कारवाई सुरू केली.