Nagpur Crime News : उपराजधानीत व्यावसायिकाकडून 4 कोटी 38 लाखांची लूट; नागपूर-जबलपूर रोडवरील घटना
Nagpur Crime News : नागपूर-जबलपूर महामार्गावर आदी ट्रॅव्हल्स कंपनीचे 4 कोटी 38 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकांची कार अडवून चोरट्यांनी त्यांच्याकडील संपूर्ण रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे.
Nagpur News नागपूर : उपराजधानी नागपूरात (Nagpur News) दरोडेखोरांवर कुणाचाच वचक नसल्याचे चित्र दिसत आहे. सुरक्षायंत्रणेने अनेक दावे करूनही शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी सावनेर येथे दरोडेखोरांनी एटीएम फोडून 10 लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेला 24 तास उलटून गेले असतांनाच आदी ट्रॅव्हल्स कंपनीचे 4 कोटी 38 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकांची कार अडवून चोरट्यांनी (Nagpur Crime News) त्यांच्याकडील संपूर्ण रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर-जबलपूर महामार्गावरील गवसी-मानापूर शिवारात मंगळवारी 30 जानेवारीच्या रात्री दहा, साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्या नंतर चक्क 12 तासांनंतर पोलीसात (Nagpur Police) तक्रार नोंदविण्यात आल्याने फिर्यादीवरही संशय व्यक्त केला जात आहे.
4 कोटी 38 लाख रुपयांची रोख लंपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील आदी ट्रॅव्हल्स कंपनीचे परमार कल्पेश झिलूजी (48, रा. डॉ. आंबेडकरनगर, लकडगंज, नागपूर) आणि जयेश पटले (26, रा. काचोर, अहमदाबाद, गुजरात) हे दोन्ही व्यापारी कारने सुरतच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांनी आपल्या एमपी-09/ झेड के-0541 क्रमांकाच्या कारमध्ये 4 कोटी 38 लाख रुपयांची रोख आपल्या गाडीत ठेवली असल्याची गुप्त माहिती अज्ञात चोरट्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी इनोव्हा आणि स्वीफ्ट या दोन वाहनामधून त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.
त्या दोन्ही वाहनांमध्ये जवळ जवळ सात चोरटे होते. नागपूर-जबलपूर रिंग रोडवरील गवसी-मानापूर गावाजवळील पुलावर कुणीही नसतांना चोरट्यांनी त्यांचे वाहन अडवले आणि त्याच्यातील एकाने व्यापाऱ्याला कारसमोर तर दुसऱ्याला कार मागे उभे केले. त्यानंतर त्यांनी कारची झडती घेतली आणि कारमधील 4 कोटी 38 लाख रुपये असलेली बॅग धमकी देऊन हिसकावून घेतली. त्यानंतर या सातही चोरट्यांनी आपल्या दोन्ही वाहनांमधून घटनास्थळावरून पळ काढला.
घटना घडून गेल्याच्या 12 तासानंतर पोलिसांत तक्रार
घटनेनंतर भीतीपोटी परमार आणि जयेश यांनी वाहन कोतवाडा जवळील इम्पेरियल सिटीजवळ उभे केले. घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तसे न करता त्यांनी ती रात्र त्याच ठिकाणी काढली आणि बुधवार 31 जानेवारीच्या सकाळी हिंगणा पोलीस स्टेशन गाठत घटनेची माहिती दिली. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुदर्शन आणि डॉ. अनुराग जैन, पोलीस सहउपायुक्त प्रवीण तेजाळे, पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी लगेच घटनास्थळ आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
पंचनाम्यानंतर हिंगणा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र तब्बल 12 तास घटनास्थळी मुक्काम केल्याने त्यांच्या भूमिकेवरही पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या