Nagpur News : रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या हत्येतील संशयित आरोपीला अटक; अवघ्या 12 तासांच्या आत ठोकल्या बेड्या
Nagpur Crime News : प्लॉट विक्री व्यवहारातील पैशाच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने फरार संशयित आरोपीला अवघ्या 12 तासात अटक केली आहे.
Nagpur News: नागपूर: प्लॉट विक्री व्यवहारातील पैशाच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने फरार संशयित आरोपीला अटक केली आहे. 21 जानेवारीला भरदिवसा कुही हद्दीत मौजा पाचगाव शिवार येथे हा हत्येचा (Crime) थरार घडला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
नागपूर (Nagpur Crime News) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे नागपूर शहर तसेच ग्रामीण भागात या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला होता. गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित आरोपीला अवघ्या 12 तासात शोधून काढले आहे. मुख्य संशयित आरोपीसह अन्य दोन साथीदार आणि गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पैशाच्या वादातून झाली होती हत्या
नागपुरातील कुही हद्दीत मौजा पाचगाव शिवार येथे 21 जानेवारीला भरदिवसा रिअल इस्टेट व्यावसायिक विनोद अशोक बोंदरे यांची हत्या करण्यात आली होती. अशोक यांचेच साथीदार सचिन परशराम फेडरकर, रोशन बालाजी बोकडे आणि मृणाल / मोंटू अरुण भोयर यांनी हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत मारेकऱ्यांच्या शोध सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विनोद आणि सचिन हे दोघे रिअल इस्टेट व्यवसायात भागीदार असून त्यांचे दिघोरी परिसरात यशश्री लॅण्ड डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरू होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सचिनने प्रॉपर्टी व्यवसायातील पैशाच्या आणि हिशोबाच्या कारणावरून मृतकाने संशयित आरोपीस शिवीगाळ केला. याचा राग मनात धरून सचिनने इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.
अवघ्या 12 तासात आरोपींना घेतले ताब्यात
हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ ठोकला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे नागपूर शहर तसेच नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील वेलूतर, कुही, भिवापूर, उमरेड भागात शोध सुरू केला. गुप्त बातमीदाराद्वारे पोलिसांना माहिती मिळाली की, खून करून संशयित आरोपी भंडारा जिल्ह्यातील पवनी भागात स्कार्पिओ वाहन (क्र. एम एच 31 डब्ल्यू एस 0001) मधून पळून गेले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके वेगवेगळ्या मार्गांनी रवाना झाले. पोलिसांना तेच स्कार्पिओ वाहन जात असल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना वाहनासह अटक केली.
इतर महत्वाच्या बातम्या