(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : रिअल इस्टेट व्यावसायिकाची किरकोळ वादातून हत्या; परिसरात खळबळ
Nagpur Crime News : किरकोळ वादातून नागपूरच्या प्रॉपर्टी डिलरची हत्या करण्यात आली. ज्यामध्ये चालत्या गाडीमध्ये चाकूने वार करत हा हत्येचा घडला आहे.
Nagpur News: नागपूर: किरकोळ वादातून नागपूरच्या प्रॉपर्टी डिलरची हत्या (Crime) करण्यात आली. चालत्या गाडीमध्ये चाकूने वार करत हा हत्येचा थरार उमरेड मार्गावरील कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांपा परिसरात घडला. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. ही थरारक घटना रविवारी घडली. सट्टयाच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती कुही पोलिसांनी दिली आहे.
हत्येचे मूळ कारण हे ले-आउटच्या वादातून झाली असल्याची चर्चा आहे. विनोद अशोकराव बोंदरे असे 36 वर्षीय मृत रिअल इस्टेट व्यावसायिकाचे नाव आहे. ते नागपुरातील (Nagpur Crime News) दिघोरी टेलिफोन नगरातील रहिवासी होते. या प्रकरणी कुही पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर सचिन परसराम पेंढारकर (मूळ रा. लाखनी), त्याचा साथीदार रोशन मानवटकर तसेच इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालत्या गाडीत हत्येचा थरार
विनोद आणि सचिन हे दोघे रिअल इस्टेट व्यवसायात भागीदार असून त्यांचे दिघोरी परिसरात यशश्री लॅण्ड डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरू होता. सचिन याला क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्याची देखील सवय असल्याचे बोलले जात आहे. शनिवारीही त्यांच्यात वाद झाला होता. सतत वाद होत असल्याने सचिनने विनोदच्या खुनाचा कट रचला. रविवारी दुपारी सचिनने विनोदशी संपर्क साधला आणि 'उमरेड मार्गावर कमी भावात शेती मिळत असल्याने ती बघण्यासाठी रविवारी दुपारी सोबत जाऊ’ असे सांगितले.
दरम्यान, सचिनने आपली कार नादुरुस्त असल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे विनोद चालक सतीश देऊळकर याच्यासह कार घेऊन दिघोरी परिसरात आला. सचिनचा एक साथीदार चालकाच्या बाजूला बसला. तर सचिन आणि रोशन हे विनोदच्या सोबत मागे बसले. दरम्यान दुपारी 12 वाजताच्या सुमारास कार चांपा परिसरात आली. दरम्यान सचिन आणि त्याच्या साथीदाराने अचानक विनोदवर चाकूने वार करायला सुरुवात केली. सतीशने विनोदाला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्यातील एकाने त्यालाही चाकूचा धाक दाखविला आणि सतीशला कारमधून उतरविले.
मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
चालत्या गाडीत हा हत्येचा थरार सुरू होता. त्यानंतर तिन्ही मारेकरी कारमधून उरतले आणि पाचगावपर्यंत ते पायी गेले. त्यानंतर त्यांनी पळ ठोकत पसार झाले. सतीशने जखमी विनोदला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून विनोदला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा हॉस्पिटल आणि नंतर घटनास्थळी पोहचून तपास केला. पोलिसांनी मारेकऱ्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: