Nagpur News : शिक्षकी पेशाला काळीमा! महिलांच्या स्वच्छगृहात छुप्या पद्धतीने चित्रीकरण करणारा वासनांध शिक्षक गजाआड
Nagpur Crime News: नागपुरात नुकताच पार पडलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवातील महिला स्वच्छतागृहात छुप्या पद्धतीने मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे.
Nagpur News : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उपराजधानी नागपूर(Nagpur News) मध्ये घडली आहे. नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवातील (Khasdar Audyogik Mahotsav) महिला स्वच्छतागृहात छुप्या पद्धतीने मोबाईल मध्ये चित्रीकरण केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा विकृत प्रकार करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून एका नामांकित शाळेतील शिक्षकच असल्याचं उघड झालं आहे. या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी (Nagpur Police) या शिक्षकाला अटक केली आहे.
मोबाईलद्वारे महिला स्वच्छतागृहात चित्रीकरण
असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट (एड) तर्फे आयोजित आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून 27 जानेवारी ते 29 जानेवारी असा तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाच्या मंचावर विदर्भातील सर्वात मोठे इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस ॲण्ड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून विदर्भातील गुंतवणुकीला गती देणे हा मुख्य उद्देश होता. त्यामुळे विदर्भासह देशभरातून अनेकांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती.
दरम्यान, त्या ठिकाणी महिलांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहात काही महिला गेल्या होत्या. तेव्हा स्वच्छतागृहाच्या मागच्या खिडकीतून एक इसम मोबाईलद्वारे चित्रीकरण करत असल्याची शंका त्यांना आली. त्यानंतर त्यांनी बाहेर येऊन ही माहिती पोलिसांना दिली. तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चित्रीकरण करणारा संशयित व्यक्तीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेही दिसून आला नाही.
सीसीटीव्हीच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध
29 जानेवारीच्या संध्याकाळी पुन्हा एकदा एका महिलेने तशीच तक्रार दिल्यानंतर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे संशयित व्यक्तीचा पुन्हा शोध घेण्यात आला. त्यावेळी अधिक पोलीस नेमून सर्वत्र पाहणी केली असता हा संशयित व्यक्ती परिसरातील व्हीआयपी गेटच्या जवळ उभा असल्याचं आढळून आले. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये स्वच्छतागृहातील अनेक महिलांचे चित्रीकरण मिळाले.
त्यानुसार गेले तीन दिवस हा माणूस त्या ठिकाणी असलेल्या महिला स्वच्छतागृहात छुप्या पद्धतीने चित्रीकरण करत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी मंगेश खापरे या शिक्षकाला अटक केली असून त्याने हे चित्रीकरण कोणत्या उद्दिष्टाने केले आहे, याची चौकशी केली जात आहे. मात्र, या घृणास्पद प्रकारामुळे समाजातील सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nagpur Crime News : हत्या प्रकरणातील दोषी पॅरोलवर सुटला, मायलेकींच्या अब्रूवरच हात घातला