गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मानपाडा पोलिसांची कारवाई
Cannabis Smuggling News : गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून डोंबिवलीत गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Cannabis Smuggling News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून गांजा आणून डोंबिवलीत विकणाऱ्या त्रिकुटाचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मयूर जडाकर, अखिलेश धुळप आणि सुनील उर्फ लोका खजन उर्फ पावरा अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांमधील मयूर जडाकर याच्या विरोधात या पूर्वी गांजा तस्करीप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात दोन तर मध्यप्रदेशमध्ये एक गुन्हा दाखल असून चार महिन्यापूर्वीच जेलमधून सुटला होता.
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनिल तारमळे यांना डोंबिवलीतील देसले पाडा येथील एका घरात विक्रीसाठी गांजाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुनील तारमळे यांच्या पथकाने देसले पाडा येथील एका घरात छापा टाकला. या छाप्यात त्यांना सुमारे सहा किलो गांजा आढळून आला. मानपाडा पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेत घरात आढळलेला मोबाईल फोन, रोख रक्कम, गाडी असा एकूण 1 लाख 87 हजरांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या संशयितांकडे चौकशी केली असता हा गांजा त्यांनी शिरपूर येथून विकत आणला असल्याची माहिती दिली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर लाकड्या हनुमान गाव येथे एका जंगलात गांजाची शेती केली जाते. तेथून हा गांजा चोरट्या मार्गाने शहरात आणून विक्री केला जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता शिरपूर पोलिसांच्या रडारवर हे गांजा तस्कर आले आहेत. हा गांजा शहरातील विद्यार्थी व उच्चशिक्षित लोकांना विकला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यापूर्वी देखील शिरपूर येथील गांजा तस्कर त्रिकूटाला मानपाडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिरपूर मधील दुसरी टोळी मानपाडा पोलिसांच्या हाती लागली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या