BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
वॉर्ड क्रमांक 95 वरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्यात मतभेद झाले होते. आपापल्या उमेदवारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दोघांनी सुद्धा ताकद लावली होती.

BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी युती करत महायुतीला तगडा झटका दिला आहे. फरक पडणार नाही, फरक पडणार नाही अशी वल्गना महायुतीकडून केली जात असतानाच भाजपने एक पाऊल मागे घेत शिंदेंच्या शिवसेनेला अधिक जागा देत ठाकरे बंधूंच्या आव्हानाची जाणीव करून घेतली आहे. दरम्यान ठाकरे बंधूंच्या जागा वाटपामध्ये शिवसेना ठाकरे गटच मोठा भाऊ ठरला आहे. शिवसेना ठाकरे गट मुंबईमध्ये 163 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर मनसेकडून 53 जागांवर उमेदवार देण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 11 जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या मदतीला असणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (30 डिसेंबर) शेवटचा दिवस होता. ठाकरेंच्या शिवसेनेतही अनेक वॉर्डमध्ये बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट झालं आहे. भाजपची बंडखोरी चर्चेत असतानाच वॉर्डमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असंच चित्र निर्माण झालं आहे. वॉर्ड क्रमांक 95,106, 114, 169, 193, 196, 202 आणि 203 याठिकाणी ठाकरे विरुद्ध ठाकरे उमेदवार असं चित्र निर्माण झालं आहे.
चंद्रशेखर वायंगणकर यांची बंडखोरी
वॉर्ड क्रमांक 95 वरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्यात मतभेद झाले होते. आपापल्या उमेदवारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दोघांनी सुद्धा ताकद लावली होती. मात्र, वरुण यांच्या उमेदवाराला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झुकते माप दिले. यामुळे अनिल परब नाराज झाल्याची चर्चा होती. त्यामुळे ते मातोश्रीवरून नाराज होऊन निघून गेले होते, अशीही चर्चा रंगली होती. मात्र, त्या सर्व चर्चांवर वरुण सरदेसाई यांनी खुलासा केला होता. आता याच वार्डात अनि परब यांनी ताकद लावलेल्या चंद्रशेखर वायंगणकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे हरित शास्त्री हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे चंद्रशेखर वायंगणकर बाजी मारणार की अधिकृत हरीश शास्त्री बाजी मारणार की वायंगणकर यांची समजूत घातली जाणार याची उत्सुकता आहे.
कोणत्या वॉर्डात ठाकरे मनसे युतीत बंडखोरी?
- 95 चंद्रशेखर वायंगणकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार हरी शास्त्री - ठाकरे)
- 106 सागर देवरे, ठाकरे (अधिकृत उमेदवार सत्यवान दळवी - मनसे)
- 114 अनिशा माजगावकर, मनसे (अधिकृत उमेदवार राजोल पाटील - ठाकरे)
- 169 कमलाकर नाईक, ठाकरे (अधिकृत उमेदवार प्रवीणा मोरजकार - ठाकरे)
- 193 सूर्यकांत कोळी, ठाकरे (अधिकृत उमेदवार हेमांगी वरळीकर - ठाकरे)
- 196 संगीता जगताप, ठाकरे (अधिकृत उमेदवार पद्मजा चेंबूरकर - ठाकरे)
- 202 विजय इंदुलकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव - ठाकरे)
- 203 दिव्या बडवे, ठाकरे (अधिकृत उमेदवार भारती पेडणेकर - ठाकरे)
अनिल परब आणि वरुण सरदेसाईंमध्ये काय घडलं?
प्रभाग क्रमांक 95 ची जागा ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. माजी नगरसेवक चंद्रशेखर वांयगणकर यांनाच उमेदवारी पुन्हा द्यावी असा आग्रह आमदार अनिल परब यांनी पक्षाकडे धरला. पक्षाचा बालेकिल्ला असल्याने उमेदवार जिंकून येईल असा विश्वास परब यांनी दिला. दुसरीकडे ही जागा श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना द्यावी, अशी भूमिका वरुण सरदेसाई यांनी घेतली. हरी शास्त्री यांनी वरुण सरदेसाई यांच्यासाठी वांद्रे पूर्वमधून निवडून आणण्यासाठी आणि पक्षासाठी मोठं काम केलं असल्याचं वरुण सरदेसाई यांनी पक्षप्रमुखांना सांगितलं आणि ही जागा जिंकून येईल असा विश्वास दिला. उद्धव ठाकरे यांनी अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांचं ऐकल्यानंतर प्रभाग क्रमांक 95 मधून हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. हरी शास्त्री यांना उमेदवारी मिळाल्यानंतर चंद्रशेखर वांगणकर हे नाराज झाले. अनिल परब सुद्धा नाराज झाल्याचे समोर आले.
इतर महत्वाच्या बातम्या





















