तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
अजित पवारांनी पुणे मनपासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केल्या आहेत. कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायरला प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

Pune Municipal Corporation Election: अगदी दोन महिन्यांपूर्वी बारामतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत कोणी हार्ट काढला आणि सापडला तर त्याला डायरेक्ट टायरीत घालतो, भिंतीवर फुटपाथवर हार्ट काढत बसू नका, मी आता कॅमेरे लावणार असून जो सापडेल त्याला टायरीमध्येच टाकतो, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. आता त्याच अजित पवारांनी पुणे महानगरपालिकेत मात्र भलताच हातखंडा वापरताना अट्टल गुन्हेगारांना शोधून शोधून उमेदवारी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रीपद, स्वत:चा बालेकिल्ला असूनही अजित पवार यांना गुंडांच्या हातीच महापालिका द्यायची ठरवली आहे का? असाच प्रश्न पुण्याच्या सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. पुण्यामध्ये कोयता गँगचा हैदोस सुरू असताना पुणे शहर गुन्हेगारीमुक्त व्हावं अशी सर्वसामान्य माणसांकडून अपेक्षा व्यक्त होत असताना अजित पवारांनी मात्र गुंडांवर गुंड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवण्यास सुरुवात केली आहे.
कुख्यात गुंडांना उमेदवारी
अजित पवारांनी पुणे मनपासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केल्या आहेत. कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायरला प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली आहे. दिपक मारटकर हत्या प्रकरणात तो जामीनावर आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना सुद्धा प्रभाग 23 मधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या दोघी जेलमधून निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे कुख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही घराण्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीचा इतिहास असतानाही अजित पवारांनी सढळ हाताने उमेदवारी दिल्याने पुण्यातील गुन्हेगारीमुक्तीची स्वप्ने पाहणाऱ्या 'पालकमंत्री' अजित पवारांना आता या उमेदवारी कशा चालतात? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोण आहे बापू नायर?
बापू नायरवर हत्येचा पहिला गुन्हा 2001 मध्ये पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात नोंद झाला. किरकोळ वादात त्याने मित्राचा खून केला. तेव्हापासून त्याचा गुन्हेगारीत शिरकाव झाला. बापू नायरने स्थानिक गुंडांच्या साथीने बिबवेवाडी, कोंढवा, धनकवडी तसेच सहकारनगर या भागात टोळीचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व निर्माण केले. खूनाचे प्रयत्न, मारामारी, भांडणे, खंडणी अशा गुन्ह्यातून तो या भागातील भाई झाला.
बैजू नवघणेचा खून
बिबवेवाडी तसेच आसपासच्या परिसरात बापू नायर तसेच गुंड बैजु नवघणे यांच्यात वर्चस्वावरुन वाद होते. 2011 मधे नवरात्रीत निघणाऱ्या देवीच्या मिरवणूकीत बैजु नवघणे व बापू नायर यांच्यात वाद झाल्यानंतर बापू नायर टोळीने बैजूचा खून केला होता. त्यानंतर बापू नायर टोळीची पुण्यात दहशत आणखी वाढली. या गुन्ह्यात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, पुढे नायरची निर्दोष मुक्तता झाली.
गजा मारणे व बापू नायर एकत्र
कोथरूड भागात गुन्हेगारी करणारा गँगस्टर गजा मारणे आणि बापू नायर यांच्यात मैत्री झाली. कोथरूड भागात बापू नायरने गजानन मारणेच्या साथीने केबल व्यवसाय सुरु केला होता. बिबवेवाडी व आसपासच्या परिसरात बापू नायर टोळीकडून सातत्याने दहशतीचे साम्राज्य उभे केले जात होते. रस्त्यावरील वाहने तोडफोड करून दहशत माजविण्यात येत होती. त्यामुळे नागरिक भयभीत होत असत
एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा
बापू नायर याच्यावर 2015 मध्ये खूनाचा प्रयत्न यासह वेगवेगळ्या कमलांनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात तो अटक होता. त्याचवेळी सहकारनगर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात न्यायालयाने बापू नायरला एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.
बापू नायरला मारटकर खूनप्रकरणात अटक
बापू नायर 2015 पासून कारागृहात होता. तो 2021 मध्ये कारागृहातून बाहेर आला. 2020 मध्ये तेव्हाच्या शिवसेना युना सेनेचा नेता दिपक मारटकरचा खून झाला. स्वप्नील मोढवे या खूनातील मुख्य आरोपी, बापू नायर कारागृहातून चेकपसाठी ससून रुग्णालयात आल्यानंतर मारटकर खूनापुर्वी स्वप्नील मोढवे, बापू नायरला भेटला होता. मारटकर खूनात स्वप्नीलला अटक करून चौकशी केल्यानंतर ससून रुग्णालयातील भेट समोर आली होती. त्यानंतर या गुन्ह्यात बापू नायरला पुणे पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, 2024 मध्ये बापू नायर या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















