BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
संभाजीनगरप्रमाणेच नाशिक, अकोला, जालन्यात भाजप कार्यकर्त्यांचा संताप पाहायला मिळाला.. एकीकडे दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश द्यायचा... आणि तिकीट देताना निष्ठावंतांना डावलायचं? हेच का भाजपचं पार्टी विथ डिफरन्स? असा प्रश्न तळागाळातला कार्यकर्ता विचारतोय... या प्रश्नाचं उत्तर भाजपमधला कोणता नेता देणार?
नाशिकमध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा कारचा पाठलाग सुरू होता.. खरं तर पाठलाग कारचा किंवा त्यामध्ये बसलेल्या भाजप शहराध्यक्षाचा नव्हे, तर त्या कारमधून एका बंगल्याकडे निघालेल्या एबी फॉर्म्सचा सुरू होता कारनं बंगल्यात प्रवेश केला, तशी भाजपातल्या इच्छुकांनी गर्दी बंगल्याच्या गेटबाहेर एकवटली.. बंगल्याचं गेट उघडताच कार्यकर्त्यांचा लोंढा आतमध्ये शिरला.. कार्यकर्त्यांबरोबरच नाराजीचं वारं देखील बंगल्यात शिरलं
नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे यांच्याकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू झालं.. साहजिकच ज्यांना एबी फॉर्म मिळाला त्यापेक्षा ज्यांना नाही मिळाला त्यांची संख्या जास्त होती.. त्यामुळे नाराजीचा सूर देखीव वरच्या पट्ट्यापर्यंत पोहोचला
उमेदवारी न मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला राग गिरीश महाजनांना काही आवडलेला नाही... ते आता सगळ्यांची बिग बॉसकडे कम्प्लेंट करणार आहेत..
जालन्याच्या भाजपच्या माजी नगरसेविका संगीता पाचगेंनी थेट माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासमोर लोटांगण घातलं.. कारण अर्थातच महापालिकेसाठी उमेदवारी
कैलास गोरंट्याल यांनी तिथून काढता पाय घेत संगीता पाचगेंना जो निरोप द्यायचा तो शब्दांविना दिला
शकुंतला जाधव या भोवळ येऊन निपचित पडल्यात.. त्यांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झालाय.. कारण भाजपनं त्यांना अकोला महापालिकेसाठी तिकीट नाकारलंय.. अकोल्यातील भाजप निवडणूक प्रभारींच्या निवासस्थानाबाहेर हा गोंधळ सुरू होता अखेर शकुंतला जाधव यांना रिक्षातून रूग्णालयात दाखल करण्यात आलं
नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाची अवस्था राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केलीय ज्यांना पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली त्यांनी आपला राग पक्षाच्या कार्यालयात तोडफोड करून व्यक्त केला... हा उद्रेक आहे गेली १५ - २० वर्षे पक्षांसाठी सतरंज्या आणि खुर्च्या उचलणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा.. हा उद्रेक आहे आपल्या नेत्यामागे सावलीप्रमाणे भटकणाऱ्या, पण ऐनवेळी नेत्याकडूनच झटकल्या जाणाऱ्यांचा... हा उद्रेक आहे पक्षानं पाठीत खंजीर खुपसल्याची भावना असणाऱ्यांचा..























