Mumbai Crime : कुत्र्यासोबत खेळण्यावरून वाद; आईसह मुलाला मारहाण, मुलाचा मृत्यू तर आई गंभीर
Mumbai Crime News : मुंबईतील नेहरुनगर परिसरातील या घटनेनं परिसर हादरुन गेला असून सूरजच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Mumbai Crime News : मुंबईतील नेहरुनगर परिसरात काल बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास खळबळजनक घटना समोर आली आहे. नेहरूनगर परिसरात झालेल्या किरकोळ भांडणातून आई आणि मुलाला एकाने जबर मारहाम करत गंभीर जखमी केले. यात 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती गंभीर आहे. कुत्र्यासोबत खेळण्यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर आलं आहे. सूरज कनोजिया असं मृत मुलाचं नाव आहे तर शेखर नायर असं आरोपीचं नाव आहे.
शेखरनं केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या सूरज आणि त्याच्या आईला उपचारासाठी जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल केले. तिथं 20 वर्षीय सूरजचा मृत्यू झाला. आई अजूनही जीवन-मरणाशी झुंज देत आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी भादंवि कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
सूरजच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार सूरजची आई तिच्या 3 वर्षाच्या नातवासोबत घराबाहेर बसली होती. ते मुल शेजारी बसलेल्या कुत्र्याशी खेळत होते. तेवढ्यात 55 वर्षीय शेखर नायर आला आणि त्यांना शिवीगाळ करू लागला. आईचे शेखरशी भांडण सुरू होते, यादरम्यान मुलगा सूरज कनोजियाही तिथं आला. यावेळी वाद वाढला आणि शेखरने आई आणि सूरजवर चाकूने हल्ला केला आणि पळून गेला.
घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने आई आणि मुलगा दोघांनाही कूपर हॉस्पिटलमध्ये नेले गेले. सूरज कनोजियाला उपचारापूर्वी मृत्यू घोषित केलं तर सूरजची आई देखील जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे.
या प्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपी शेखर नायर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सध्या शेखरची चौकशी सुरू असून पीडित कुटुंबियांनी आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. या घटनेनं परिसर हादरुन गेला असून सूरजच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Crime News: चार वर्षाच्या मुलासह पत्नीचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव; कारण ऐकून...