मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
महापालिका निवडणुकीत भाजप आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबीयांना म्हणजेच मुलं, बायको वगैरे त्यांना तिकीट देण्यात येणार नाही.

मुंबई : नगरपालिका निवडणुकीला (Election) एकाच घरातील 6 उमेदवारांना तिकीट देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकांसाठी नवा पॅटर्न सुरू केला आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून महापालिका निवडणुकीत आमदार-खासदारांच्या मुलास किंवा पत्नीस उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार, भाजपकडून (BJP) आज महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. मात्र, या यादीत आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आलं नाही. याशिवाय ज्या प्रभागातून आमदार-खासदारांच्या मुलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तिथे माघार घेण्यात आली आहे. नाशिकमध्ये (Nashik) दोन्ही महिला आमदारांच्या मुलांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत.
महापालिका निवडणुकीत भाजप आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबीयांना म्हणजेच मुलं, बायको वगैरे त्यांना तिकीट देण्यात येणार नाही. नाशिकमधील आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या मुलांचे अर्ज माघारी घेतले आहेत. तर खासदार धनंजय महाडिक यांच्या पोरानेही उमेदवारी अर्ज भरला होता, तो देखील मागे घेतला आहे. कृष्णराज महाडिक यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, राज्य पातळीवर नेत्यांच्या घरात उमेदवारी न देण्याचा भाजपचा निर्णय झाला असल्याने कृष्णराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पक्षाचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत, असे म्हणत धनंजय महाडिक यांनी भारतीय जनता पक्षाचा महापालिका निवडणुकीसंदर्भातील निर्णयच सांगितला आहे.दरम्यान, भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भाऊ आणि वहिनीला उमेदवारी दिली आहे.
भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलाचा नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. भाजप पक्ष नेतृत्वाने आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचा निर्णय घेतल्याने ही माघार घेण्यात आली आहे. तर, आमदार देवयानी फरांदे यांनी भाजप पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयाचे स्वागतही केले. आमदार सीमा हिरे यांची मुलगीही नाशिक पालिका निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडली आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार, अशी प्रतिक्रिया देवयानी फरांदे यांनी दिली.
तिकीट न मिळालेल्यांची नाराजी दूर करू
महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजांची संख्या आहे. मात्र, आम्ही त्यांना दोन दिवसात समजावून सांगू. महायुतीची सांगडं घालताना अनेकांवर अन्याय झाला हे मान्य मात्र त्यांची समजूत काढू, असे म्हणत खासदार धनजंय महाडिक यांनी नाराजांची समजूत काढण्याचे ठरवले आहे. धनश्री तोडकर यांची देखील भेटून नाराजी दूर करू, काँग्रेसचे अनेक इच्छुक संपर्कात आहेत. मात्र, आमची यादी फिक्स झाली आहे, असेही महाडिक यांनी म्हटले.
हेही वाचा
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?























