कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
Kolhapur Municipal Corporation Election: भाजप 36 जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत.

Kolhapur Municipal Corporation Election: गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांवर बैठका असा सिलसिला सुरू असलेल्या महायुतीनं कोल्हापूर मनपासाठी जागावाटपावर यशस्वी पडदा पडला आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये एकमत झाला असून 81 जागांमध्ये भाजप मोठा भाऊ झाला आहे. भाजप 36 जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बैठकांवर बैठकांचा सिलसिला नेत्यांमध्ये सुरू होता. अखेर आज (29 डिसेंबर) सायंकाळी महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जागावाटपाची घोषणा केली. त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फुट झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाने तिसऱ्या आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवत आहे. यामध्येही काँग्रेसचे उमेदवार सर्वाधिक असणार आहेत. दुसरीकडे तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्ष आहे.
हाडाचं काडं, रक्ताचं पाणी करु
हसन मुश्रीफ म्हणाले की, आम्ही जिद्दीने 81 उमेदवार निवडून आणण्यासाठी हाडाचं काडं, रक्ताचं पाणी करु. पाच वर्षांपूर्वी निवडणूक झाली असती तर इतके इच्छुक तयार झाले नसते. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. तिन्ही पक्षांचे प्रमुख कोल्हापुरात प्रचारासाठी येणार आहेत. राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता दिसल्यानंतर विरोधक कसा निधी आणणार? अशी विचारणा त्यांनी केली. मोठ्या मोठया गप्पा मारून विकास कामे करता येत नाही. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देण्याचे वचन आम्ही पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे नेते म्हणाले की क्रॉस वोटिंग झालं तर राजीनामा घेणार, पण लोकशाही असं करता येत नाही हे माझ्या मित्राला माहिती नाही, असा टोला त्यांनी सतेज पाटील यांना लगावला.
जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न
दरम्यान महायुती होताच खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, उद्या सकाळी आम्ही यादी जाहीर करणार आहोत. आम्ही जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ज्यांना उमेदवारी मिळाली नाहीत त्यांच्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. आमचा जाहीरनामा जनतेचा अपेक्षा पूर्ण करणारा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, आमच्या विरोधकांनी कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं अशी टॅगलाईन केली आहे. मात्र, कोल्हापूर कसं, पाण्याची बोंब, रस्त्याची बोंब असे आम्ही करणार नाही असा टोला त्यांनी लगावला. कोल्हापूरकर आता कोणत्याही टॅगलाईनवर विश्वास ठेवणार नाहीत. विरोधकांच्या टॅगलाईनवर कोल्हापूरकर फसणार नाही असे ते म्हणाले. विरोधकांकडे आमदार नाहीत, मंत्री नाहीत मग तुम्ही कसा विकास करणार? असे विचारणा त्यांनी केली.
आम्ही अतिशय तगडे उमेदवार दिले
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, महायुती काय करते याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. आम्ही अतिशय तगडे उमेदवार दिले आहेत. महायुती कोल्हापूरकरांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार असून असून जिल्ह्यात दोन्ही मंत्री महायुतीचे आहेत, आमदार माहितीचे आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहराला कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या





















