(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, कर्जतमधील धनगर समाज संघटनांची तक्रार
Gopichand Padalkar : कर्जत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याची तक्रार करण्यात आली.
अहमदनगर: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भादवि कलम 505 (2) अन्वये हा गुन्हा दाखल झाला आहे.धनगर समाजातील विविध संघटनांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कर्जत पोलिसात तक्रार दाखल केली होती. रविंद्र पांडुळे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगरच्या चौंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रत केले होते. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. यानिमित्ताने पवार -पडळकर यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला.
गोपीचंद पडळकर हे चौंडीत येण्यासाठी निघाले असता त्यांना पोलिसांनी चापडगाव या ठिकाणीच अडवले. यावरून पोलीस प्रशासन आणि पडळकर यांच्यात देखील संघर्ष झाला. दोन ते तीन तास थांबून ठेवल्यानंतर पडळकर यांना पोलिसांनी चौंडीत येण्यासाठी परवानगी दिली. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोरच सभा घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार तसेच रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. एवढ्या वर्षात आताच शरद पवार यांना अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी गाव आठवले का? असा सवाल पडळकर यांनी केला. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी धनगर समाज काय मेला आहे का? असा घणाघात त्यांनी केला. सोबतच पुढच्यावर्षी जयंतीचा कार्यक्रम घेण्याचा विचार जरी पवारांनी केला तर याद राखा असं पडळकर यांनी म्हटले होते. दरम्यान, धनगर बांधवांनी पवारांना साथ देऊ नये असं आवाहन त्यांनी केलं होतं.
त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कर्जत पोलिसात करण्यात आली. विशेष म्हणजे धनगर समाजातीलच काही संघटनांनी या संदर्भात तक्रार केली. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
स्वतःच्या पक्षात वजन वाढविण्यासाठी समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
गोपीचंद पडळकर यांनी स्वतःच्या पक्षात आपले वजन वाढविण्यासाठी शरद पवार यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलं आणि समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दोन समाजात भांडण लागवं म्हणून त्यांनी चिथावणीखोर भाषण केलं. त्यांनी आमच्या नेत्यांविरोधात वक्तव्य करू नये. यापुढे आमच्या नेत्यांच्या विरोधातील वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा तक्रारदार रवींद्र
पांडुळे यांनी दिला आहे.