Crime News : 35 घरफोडी केलेल्या दोघांना मुंबई पोलिसांकडून नाट्यमयरीत्या अटक
Mumbai Crime News : 35 घरफोडी केलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना नाट्यमयरीत्या अटक केली आहे. मुंबईतील एमएचबी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Mumbai Crime News : मुंबईतील बोरिवलीमधील एमएचबी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना नाट्यमरीत्या अटक केली आहे. या दोघांना 35 घरफोडी करून चोरी केल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या गस्तीच्या दरम्यान या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
मागील आठवड्यात 17 मे रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरिक्षक संदीप साळवे आणि एक पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर होते. बोरिवलीतील एक्सर तलाव परिसराजवळ हे गस्ती पथक आले असताना त्यांना दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे गस्ती पथकाने आपले वाहन थांबवून या दोघांची चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देताना या दोघांची भंबेरी उडाली आणि पोलिसांना टाळण्यासाठी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी पोलिसांनी पळून जात असलेल्या दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद यासिन शौकत अन्सारी ( वय 45) आणि मोहम्मद जमिल अहमद मोहम्मद हुसैन अंसारी ( वय 44) असे आहे. एकजण मूळचा उत्तर प्रदेशातील असून दुसरा दिल्लीतील आहे. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची झडती घेतली. त्यावेळ त्यांच्याकडे एक 9 इंच लांबीचा हिरव्या मुठीचा स्क्रू ड्रायवर, फोल्डिंगची दीड फूट लांबीची कटावणी, एक अॅडजस्टेबल पाना अशी हत्यारे सापडली.
या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची पोलीस ठाण्यात चौकशी कसून चौकशी सुरू केली. त्या दोघांना सदर ठिकाणी फिरण्याचा उद्देश विचारला असता त्यांनी उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी एमएचबी पोलीस ठाणे हद्दीशिवाय, दहिसर, बोरीवली व मुंबईतील इतर ठिकाणी घरफोडी करण्यासाठी आल्याची कबुली दिली. त्यांच्याजवळ असलेली हत्यारे ही घरफोडी करण्यासाठी स्वत: जवळ बाळगली असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या दोघांची सखोल चौकशी करून दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याविरोधात 35 घरफोडीचे गुन्हे नोंद असल्याचे दिसून आले.
दोन्ही आरोपींनी एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे हद्दीत एकूण 5 घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. दहिसर गावठाण, दहिसर पश्चिम या ठिकाणाहुन गुन्ह्यातील काही मालमत्ता पोलीसांच्या हाती त्यांनी सोपवली आहे. तसेच त्यांनी नवी मुंबई, ठाणे, मुंबईमध्ये गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.