Mumbai Crime : बोगस तृतीयपंथी बनून लोकांना गंडा, वैद्यकीय चाचणीनंतर सत्य चव्हाट्यावर, पोलिसांकडून बेड्या
Mumbai Crime : बोगस तृतीयपंथी बनून लोकांना गंडा घालणाऱ्या भामट्याला पोलिसांनी जेरबंद केलं असून वैद्यकीय चाचणीनंतर हा भामट्या तृतीयपंथी नसल्याचं सिद्ध झालं आहे.

Mumbai Crime : आजवर चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अनेकजण वेगळा वेश धारण करुन चोऱ्या करतात, तर काही लोक खोटी ओळख सांगून विश्वास संपादन करुन चोऱ्या करतात. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला. तुमच्या घरात संकट आलं आहे, त्याचं निवारण मी करतो, असं सांगून तृतीयपंथी बनून नागरिकांना लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पंतनगर पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
मुंबईतील पंतनगर भागात तृतीयपंथी बनून तुमच्या घरात संकट आलं आहे, त्या संकटाचं निवारण मी करतो, असं सांगून नागरिकांना लुटणाऱ्यां अट्टल भामट्याला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जितुभाई जव्हेरभाई परमार असं या बोगस तृतीयपंथीचं नाव आहे. गेल्या वर्षी पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या दाणाभाई पटेल यांच्या घरी हा जितूभाई तृतीयपंथी बनून आला होता. घराबाहेर काळी फुल्ली मारून त्यानं तुमच्या घरावर घोर संकट आलं आहे, असं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सांगितलं.
घरावरील संकटाबाबत सांगितल्यानंतर घाबरलेल्या पटेल कुटुंबियांनी त्याला घरात प्रवेश दिला. त्यानंतर या भामट्यानं पाण्याच्या ग्लासमध्ये थोडी मिर्ची आणि मीठ टाकून आणा असं घरातील सदस्यांना सांगितलं. त्यानंतर त्यानं ते पिऊन टाकून आपलं संकट पिऊन टाकलं आहे, असं सांगितलं. त्यानंतर घरातील कुटुंबियांच्या अंगावरील प्रत्येकी एक असा सोन्याचा दागिना एका रुमालामध्ये ठेवण्यास सांगून तो रुमाल घेऊन मागे न पाहता चालण्यास त्यानं सांगितलं. हातातील रुमाल माझा हातात द्या आणि मागं न बघता चालत राहा, असं सांगून सर्व सोने स्वतःकडे घेतलं आणि मागच्या मागे पोबारा केला.
दरम्यान, या भामट्यानं तृतीयपंथी असल्याचं भासवत तब्बल 9 तोळे सोने लुटून पोबारा केला होता. मात्र, पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पंतनगर पोलिसांनी वर्षभर त्याचा शोध घेत अखेर त्याला बेड्या ठोकल्या. त्याचे मेडिकल केल्यानंतर तो तृतीयपंथीच नसल्याचं समोर आलं आहे. या आरोपीनं गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणत असे गुन्हे केले आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील त्यानं केलेले गुन्हे आता उघड होत आहेत. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
