Mumbai Blast 7/11 Blast : 7/11 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण; 16 वर्ष लोटली तरीही दोषींच्या फाशीवर शिक्कामोर्तब नाही
Mumbai Blast 7/11 Blast 16th Anniversary : मुंबईला हादरवणाऱ्या 7/11 साखळी बॉम्बस्फोटातील दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर 16 वर्षानंतरही शिक्कामोर्तब करण्यात आले नाही.
Mumbai Blast 7/11 Blast : 11 जुलै 2006 रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून मुंबईसहस देशाला हादरवून सोडणाऱ्या घटनेला सोमवारी 16 वर्षे पूर्ण झाली. मात्र या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा मुंबई सत्र न्यायालयानं निकाल देऊन सात वर्ष झालीत तरीही दोषींच्या फाशीवर हायकोर्टाकडून अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. सोमवारी यासंदर्भातील याचिका सुनावणीसाठी कोर्टापुढे आली, तेव्हा हे प्रकरण ऐकण्यासाठी किमान पाच ते सहा महिने लागणार असल्यानं सध्याचा ताण पाहता खटल्याच्या सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी हे प्रकरण ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आलं.
अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या 7 साखळी स्फोटांत तब्बल 209 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 700 लोक जखमी झाले होते. या दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये टाईम बॉम्ब ठेवत मुंबई लोकलमधील फर्स्ट क्लासच्या डब्यांना लक्ष्य केलं होतं. मुंबई सत्र न्यायालयातील मोक्का न्यायालयानं 9 वर्षांनंतर याप्रकरणी निकाल दिला होता. न्यायालयानं यातील 13 पैकी 5 आरोपींना फाशीची, तर बाकीच्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दीकी, नावेद हुसेन खान, आसिफ खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझम्मील शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
त्यानंतर या पाच आरोपींच्या फाशीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी हे प्रकरण साल 2015 मध्येच मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालं होतं. तेव्हा या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्याची मागणी तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींकडे करण्यात आली होती, जी मान्यही झाली. मात्र त्यानंतरही तीनवेळा न्यायमूर्ती निवृत्त झाल्याच्या कारणास्तव या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान कोरोनाकाळात फाशीची शिक्षा सुनावलेल्या कमल अन्सारीचा कोठडीतच मृत्यू झालेला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: