वधू-वर सूचक संकेतस्थळावरून सात तरुणींशी लग्न, 22 महिलांची लाखो रुपयांची फसवणूक
Mumbai Crime News : वधू-वर सूचक संकेतस्थळाचा वापर करुन 22 महिलांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुंबई : वधू-वर सूचक संकेतस्थळावरून (Matrimonal Websites) संपर्क साधून देशातील 22 महिलांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना समोर आली आहे. वधू-वर सूचक संकेतस्थळाचा वापर करुन 22 महिलांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या भामट्याला पुणे पायधुनी पोलिसांनी हैद्राबाद (Hyderabad) येथून अटक केली आहे. इम्रान अली खान असं या आरोपीचं नाव असून तो हैद्राबादचा राहणारा आहे. या भामट्याने कोलकाता, लखनौ, दिल्ली आणि देहरादून येथील महिलांनाही फसवल्याचा संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वधू-वर सूचक संकेतस्थळावरून फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीने सात मुलीशी लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे. यामध्ये राज्यातील परभणी, धुळे आणि सोलापूर येथील महिलांचा समावेश आहे. अनेक मुलींवर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचाही संशय आहे. वधू-वर सूचक संकेतस्थळावरून संपर्क साधून आरोपी तरुणींशी बातचीत वाढवायचा. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचा. आपलं काम झालं की, इम्रान तरुणींशी संपर्क तोडायचा.
22 महिलांकडून उकळले लाखो रुपये
पायधुनी येथे राहणाऱ्या 42 वर्षीय शिक्षिकेची आरोपी इम्रानसोबत 2023 मध्ये वधू-वर सूचक संकेतस्थळावर ओळख झाली होती. इम्रान अली खानने आपण बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याचं या महिलेला सांगितलं. त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले असून तो मावशीसह हैद्राबाद येथे रहात असल्याची माहिती त्याने संबंधित महिलेला दिली. दोघांनीही एकमेकांना पसंत केल्यानंतर विविध कारणे देत इम्रानने शिक्षिकेकडून 21 लाख रुपये उकळले.
लग्नाचे आमीष दाखवून अनेक तरुणींची फसवणूक
कालांतराने इम्रानने फोन उचलणे बंद करून शिक्षिकेला टाळू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेनं तक्रार दाखल केली. पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चौकशी दरम्यान आरोपीची पोलिसांनी कुंडलीच काढली. आरोपी अनेक तरुणींच्या संपर्कात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आरोपीने लग्नाचे आमीष दाखवून अनेक तरुणींची फसवणूक केल्याचंही चौकशीमध्ये समोर आलं.
आणखी अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा संशय
आरोपी इम्रानच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असून त्यात हत्येच्या गुन्ह्याचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपी इम्रानचे यापूर्वी लग्न झालेलं असून त्याच्या पत्नीने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आरोपी इम्रानने आणखी अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा पोलिसांनी संशय आहे. तपासानंतरच याचा उलगडा होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :