Nagpur : आर्थिक विवंचनेतून पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
Nagpur Crime : नागपुरातील दयानंद पार्क परिसरातील एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आहे.
![Nagpur : आर्थिक विवंचनेतून पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या Maharashtra Nagpur News Family head commits suicide by killing wife and two children Nagpur : आर्थिक विवंचनेतून पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/a843a91cbbbfbd19ec7824064416aeb5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपुरातील दयानंद पार्क परिसरात आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करत स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मदन अग्रवाल असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव असून मदन याने गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी किरण, मुलगा वृषभ आणि मुलगी तोषिता यांची चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चायनीजचा स्टॉल चालवणारा मदन अग्रवाल अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्यावर अनेकांची उसनवारी होती. त्याच तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे कालच त्यांच्या भावाने त्यांना 1 हजार 500 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. दयानंद पार्क परिसरात ज्या भाड्याच्या घरी मदन अग्रवाल यांचे कुटुंब राहत होते. तिथे आज सकाळपासून कुठलीही हालचाल नव्हती. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आल्याने अग्रवाल यांच्या ओळखीतल्या काही लोकांना घरात कुठलीही हालचाल नसल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी येऊन दार तोडून घरात प्रवेश केला तेव्हा मदन अग्रवाल हे गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. तर आतील खोलीत पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून घराचा प्रत्येक कानाकोपरा शोधून पुरावे गोळा केले. प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून हत्या आणि आत्महत्येची घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिकचा तपास करत असून या बाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अद्याप हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, मदन अग्रवालला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखणाऱ्या प्रकाश हरजानी या मित्राने दिलेल्या माहितीप्रमाणे मदनचा चायनीजचा व्यवसाय खूप चांगला चालत होता. रोज आठ ते दहा हजार रुपयांचा त्यांचा व्यवसाय असल्याने महिन्याला त्यांचे उत्पन्न चांगले होते. त्यातून त्यांनी जरीपटका परिसरात एक घर खरेदी केले होते. मात्र मदन यांना 'क्रिकेट सट्टा' खेळण्याची सवय होती आणि त्यातून गेल्या काही काळात मदनच्या आर्थिक अडचणी वाढत गेल्या.काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर खरेदी करून केलेला स्वतःचे घर विकण्याची वेळ आली होती. त्यामुळे ते तणावात होते. मित्राने दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्यावर 40 ते 45 लाखांचा कर्ज झाले होता आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज त्यांचे मित्र प्रकाश हरजानी यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)